टी-20 विश्वचषकाच्या संघात शिवम दुबेला सामील न केल्यास त्याला CSK जबाबदार; माजी क्रिकेटपटूचं विधान
Shivam Dube: अनेक माजी क्रिकेटपटू शिवम दुबेला आगामी 2024 च्या टी-20 विश्वचषकाच्या संघात सामील करण्याची मागणी करत आहेत.
Shivam Dube: आयपीएल सुरु झाल्यापासून चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) अष्टपैलू खेळाडू शिवम दुबे (Shivam Dube) चर्चेत आहे. अनेक माजी क्रिकेटपटू शिवम दुबेला आगामी 2024 च्या टी-20 विश्वचषकाच्या संघात सामील करण्याची मागणी करत आहेत. याचदरम्यान भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू मनोज तिवारीने एक आश्चर्यकारक विधान केलं आहे.
शिवम दुबेला T20 विश्वचषकाच्या संघात स्थान न मिळाल्यास चेन्नई सुपर किंग्स याला जबाबदार असेल, असं मनोज तिवारीने म्हटलं आहे. मनोज तिवारीने हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवरही प्रश्न उपस्थित केला. हार्दिक पांड्याला टी-20 विश्वचषक संघात सामील व्हायचे असेल तर त्याला गोलंदाजीतही स्वत:ला सिद्ध करावे लागेल, असं मनोज तिवारीने म्हटलं आहे. हार्दिकने मागील तीन सामन्यांमध्ये फक्त एकच षटक टाकले आहे.
मनोज तिवारी हार्दिक पांड्याबाबत काय बोलला?
क्रिकबझवर बोलताना मनोज तिवारी म्हणाला, "जर हार्दिक पांड्याला 2024 च्या टी-20 विश्वचषकात खेळायचे असेल तर त्याला अष्टपैलू खेळाडूची भूमिका बजावावी लागेल. आयपीएलमध्ये तो खूप महागडा ठरत आहे. त्याचा इकॉनॉमी रेट 11 च्या आसपास आहे. तो या हंगामात चांगली कामगिरी करत नाही.
शिवम दुबेबाबत काय म्हणाला?
मनोज तिवारीने शिवम दुबेला गोलंदाजी न देण्यावरही प्रश्न उपस्थित केला. जर शिवम दुबेला टी-20 विश्वचषकाच्या संघात स्थान दिले नाही, तर त्याला चेन्नई सुपर किंग्स जबाबदार असेल, असे तो म्हणाला. हार्दिकचा फॉर्म पाहता त्याची टी-20 विश्वचषक संघात निवड होणार नाही. अजित आगरकर हे एक मजबूत व्यक्तिमत्त्व आहे आणि त्यामुळेच तो असे धाडसी निर्णय घेऊ शकतो, असंही मनोज तिवारीने सांगितले.
आज चेन्नई विरुद्ध मुंबईचा सामना:
आज चेन्नई आणि मुंबईचा सामना होणार आहे. मुंबईतील वानखेडे मैदानावर हा सामना रंगणार आहे. भारतीय वेळेनूसार सायंकाळी 7.30 वाजता हा सामना सुरु होईल. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांनी आतापर्यंत आयपीएलमध्ये पाच पाच वेळा विजेतेपद पटकावलं आहे. चेन्नई सुपर किंग्सने यंदाच्या आयपीएलमध्ये पाच पैकी तीन सामन्यात विजय मिळवला आहे. दुसरीकडे मुंबई इंडियन्सनं पाच पैकी दोन सामन्यात विजय मिळवला आहे. चेन्नई सुपर किंग्ज गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे तर मुंबई इंडियन्स गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे.
संबंधित बातम्या:
7 वर्षे डेट, लग्नाआधीच 1 मुलगा; किरॉन पोलार्डची पत्नी आहे मोठ्या ब्रँडची मालकीण, पाहा Photo's
उर्वशी रौतेला ऋषत पंतला नव्हे, तर फुटबॉलपटूला करतेय डेट?; फोटोवरील 'कॅप्शन'ने लक्ष वेधलं!
फोटो नव्हे तर हा भावनिक क्षण! धोनीने 2011च्या विश्वचषक ट्रॉफीला स्पर्श करताच भारतीय आठवणीत रमले