एक्स्प्लोर
IPL : राजस्थानवर मात करुन कोलकात्याची क्वालिफायर-2 मध्ये धडक
आता फायनलच्या तिकीटासाठी कोलकात्याचा मुकाबला हैदराबादशी होईल. हा सामना 25 मे रोजी कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवरच खेळवण्यात येईल.

मुंबई : कोलकाता नाईट रायडर्सनं आयपीएलच्या एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सवर 25 धावांनी मात केली. या सामन्यातल्या पराभवामुळं राजस्थानचं आयपीएलमधलं आव्हान संपुष्टात आलं आहे. पण दिनेश कार्तिकच्या कोलकात्यानं एलिमिनेटर सामना जिंकून क्वालिफायर टू सामन्यात स्थान मिळवलं. आता फायनलच्या तिकीटासाठी कोलकात्याचा मुकाबला हैदराबादशी होईल. हा सामना 25 मे रोजी कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवरच खेळवण्यात येईल. दरम्यान, एलिमिनेटर सामन्यात कोलकात्यानं राजस्थानला विजयासाठी 170 धावांचं आव्हान दिलं होतं. अजिंक्य रहाणेनं 46, राहुल त्रिपाठीनं 20 आणि संजू सॅमसननं 50 धावांची खेळी करूनही राजस्थानला वीस षटकांत चार बाद 144 धावांचीच मजल मारता आली. त्याआधी, या सामन्यात राजस्थाननं कोलकात्याला वीस षटकांत सात बाद 169 धावांत रोखलं होतं. राजस्थानकडून कृष्णाप्पा गौतम, जोफ्रा आर्चर आणि बेन लाफलिननं प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. कोलकात्याची आठ षटकांत चार बाद 51 अशी घसरगुंडी उडाली होती. त्या परिस्थितीत कर्णधार दिनेश कार्तिकनं आधी शुभमन गिल आणि मग आंद्रे रसेलच्या साथीनं कोलकात्याच्या डावाला मजबुती दिली. दिनेश कार्तिकनं 38 चेंडूंत चार चौकार आणि दोन षटकारांसह 52 धावांची, तर आंद्रे रसेलनं 25 चेंडूंत तीन चौकार आणि पाच षटकारांसह नाबाद 49 धावांची खेळी उभारली. शुभमन गिलनं 17 चेंडूंत तीन चौकार आणि एका षटकारासह 28 धावांची खेळी केली.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
बुलढाणा
राजकारण























