एक्स्प्लोर
टीम इंडियासाठी 'करो या मरो', केपटाऊनचा वचपा काढणार?
भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांमधल्या दुसऱ्या कसोटी सामन्याला आजपासून सेन्च्युरियनवर सुरुवात होत आहे.
सेन्चुरियन/मुंबई : विराट कोहलीच्या टीम इंडियाला केपटाऊनच्या पहिल्याच कसोटीत लाजिरवाणी हार स्वीकारावी लागली. त्यामुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यातल्या कसोटी मालिकेतलं आव्हान जिवंत राखायचं तर टीम इंडियाला आता कंबर कसावी लागणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांमधल्या दुसऱ्या कसोटी सामन्याला आजपासून सेन्च्युरियनवर सुरुवात होत आहे.
केपटाऊनमध्ये वरनॉन फिलँडरच्या चेंडूवर जसप्रीत बुमरा बाद झाला आणि पहिल्या कसोटीत टीम इंडियाला 72 धावांनी लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं.
केपटाऊनच्या त्या कसोटीत भारतीय गोलंदाजांनी खरं तर दोन्ही डावांत कामगिरी फत्ते केली होती. पण फलंदाजांच्या हाराकिरीने टीम इंडियाला चौथ्या डावात अवघ्या 208 धावांचा पाठलागही झेपला नाही. केपटाऊनच्या त्या लाजिरवाण्या पराभवाचं शल्य उरात बाळगून, विराट कोहलीची टीम इंडिया आता सेंच्युरियनच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी सज्ज झाली आहे.
टीम इंडियाची गेल्या 25 वर्षांमधील दक्षिण आफ्रिकेतली कामगिरी ही अजिबात गौरवास्पद नाही. भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेत सहापैकी पाच कसोटी मालिकांमध्ये हार स्वीकारावी लागली आहे. उरलेली एकमेव कसोटी मालिका अनिर्णीत राहिली आहे. केपटाऊन कसोटीतला पराभव हा टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिकेतल्या 18 कसोटी सामन्यांमधला तब्बल नववा पराभव होता. त्यामुळे टीम इंडियाला मालिकेतील आव्हान जिवंत राखण्याच्या इराद्याने सेंच्युरियनच्या रणांगणावर उतरावं लागेल.
अजिंक्य रहाणेला संधी मिळणार का?
सेंच्युरियनच्या दुसऱ्या कसोटीत चांगली कामगिरी बजावायची, तर टीम इंडियाच्या फलंदाजांना आपलं सर्वस्व पणाला लावावं लागणार आहे. पण त्याआधी भारतीय संघव्यवस्थापनाला आपली फलंदाजीची बाजू आणखी भक्कम करण्यावर भर द्यावा लागणार आहे. त्यासाठी पहिल्या कसोटीतून डावलण्यात आलेल्या अजिंक्य राहाणेला दुसऱ्या कसोटीत संधी मिळणार का, हा कळीचा मुद्दा आहे.
अजिंक्य रहाणेची परदेशातली आणि त्यातही दक्षिण आफ्रिकेतली प्रभावी कामगिरी लक्षात घेऊन केपटाऊनमध्ये त्याला न खेळवण्याच्या निर्णयावर टीका झाली होती. 2013 सालच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अजिंक्य रहाणे हा चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहलीनंतर तिसऱ्या क्रमांकावर होता. त्याच पार्श्वभूमीवर अजिंक्य रहाणेच्या परदेशातल्या कामगिरीकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही.
अजिंक्य रहाणेची परदेशातील कामगिरी
अजिंक्य रहाणेने परदेशातल्या 24 कसोटी सामन्यात 53.44 च्या सरासरीने 1817 धावा फटकावल्या आहेत. त्यात सहा शतकं आणि नऊ अर्धशतकांचा समावेश आहे.
अजिंक्य रहाणेने झळकावलेल्या नऊ कसोटी शतकांपैकी सहा शतकं ही भारताबाहेर आणि त्यातही लॉर्डस, मेलबर्न आणि वेलिंग्टनसारख्या वेगवान खेळपट्ट्यांवर साकारली आहेत.
त्यामुळे रबाडा, फिलँडर, मॉर्कल या दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान तोफखान्याला थोपवण्यासाठी अजिंक्य रहाणेला संधी मिळायला हवी, असं एक विचारप्रवाह सांगतो. पण अलीकडच्या काळातलं त्याचं अपयश लक्षात घेता टीम इंडियाने मधल्या फळीपेक्षा सलामीची तटबंदी भक्कम करण्यावर भर द्यायला हवा, असं दुसरा विचारप्रवाह सांगतो. त्यामुळे शिखर धवनऐवजी लोकेश राहुलचं नावही चर्चेत आलं आहे.
केपटाऊन कसोटीत न खेळलेल्या वेगवान गोलंदाजांपैकी उमेश यादव किंवा इशांत शर्माला अंतिम अकराजणांत संधी मिळण्याची चिन्हं आहेत.
टीम इंडियाला गेल्या 25 वर्षांत दक्षिण आफ्रिकेत एकही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. विराट कोहलीची टीम इंडिया हा इतिहास बदलेल अशी जाणकारांची अपेक्षा होती. पण केपटाऊनमधल्या पराभवाने टीम इंडियाच्या चाहत्यांची ती अपेक्षा फोल ठरली आहे. आता सेंच्युरियनच्या रणांगणात विराट आणि त्याचे शिलेदार काय कामगिरी बजावतात, याकडे भारतीय क्रिकेटरसिकांचं लक्ष लागलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement