भारत-इंग्लंडमधील बरोबरीची कोंडी फुटणार, आजचा सामना निर्णायक
भारत-इंग्लंड यांच्यातील अखेरचा टी-20 सामना आज ब्रिस्टलमध्ये खेळला जाणार आहे. तीन सामन्याच्या मालिकेत दोन्ही संघ 1-1 अशा बरोबरीत आहेत. त्यामुळे आजचा सामना निर्णायक ठरणार आहे.
लंडन : भारत-इंग्लंड यांच्यातील अखेरचा टी-20 सामना आज ब्रिस्टलमध्ये खेळला जाणार आहे. तीन सामन्याच्या मालिकेत दोन्ही संघ 1-1 अशा बरोबरीत आहेत. त्यामुळे आजचा सामना निर्णायक ठरणार आहे. भारत आणि इंग्लंड दोन्ही संघ आजचा सामना जिंकून मालिका जिंकण्यासाठी उत्सुक आहेत.
मालिकेत भारतानं पहिला, तर इंग्लंडनं दुसरा सामना जिंकला आहे. त्यामुळे तीन सामन्यांच्या मालिकेतली बरोबरीची कोंडी फोडण्यासाठी आजचा सामना निर्णायक ठरेल. पहिल्या टी-20 सामन्यात विराटसेनेनं इंग्लंडचा आठ विकेट्सनी धुव्वा उडवला होता. त्या सामन्यात कुलदीप यादवची फिरकी भारताच्या विजयात निर्णायक ठरली होती.
मात्र इंग्लंडनं दुसऱ्या सामन्यात कुलदीप आणि यजुवेंद्र चहलच्या फिरकीचा समर्थपणे सामना करून मालिकेत बरोबरी साधली. त्यामुळे उभय संघांमधला तिसरा आणि अखेरचा सामना अतिशय चुरशीचा होईल, अशी अपेक्षा आहे.
पहिल्या सामन्यात आपल्या फिरकीच्या जाळ्यात इंग्लंडच्या खेळाडूंना फसवणाऱ्या यजुवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांना दुसऱ्या सामन्यात आपली कमाल दाखवता आली नव्हती. त्यामुळे आजच्या निर्णायक सामन्यात चहल आणि कुलदीप यांची रणनीती कशी हे देखील महत्वाचं आहे.
पहिल्या सामन्यात दमदार शतक ठोकणाऱ्या लोकेश राहुलला दुसऱ्या सामन्यात अतिआत्मविश्वास नडला होता. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात राहुलकडूनही चांगल्या खेळीची अपेक्षा क्रिकेट चाहत्यांना आहे.
भारताचा टी 20 विक्रम भारताने नोव्हेंबर 2017 पासून एकही टी 20 मालिका गमावलेली नाही. ही मालिका जिंकल्यास भारताचा सलग सहावा मालिका विजय ठरणार आहे. या मालिका विजयांची सुरुवात भारताने 2017 मध्ये न्यूझीलंडला हरवत केली होती.