IND Vs ENG: दुसऱ्या कसोटीत इंग्लंडचं अनोखं रेकॉर्ड, टीम इंडियांचं रेकॉर्ड मोडलं
IND Vs ENG: चेन्नईमध्ये सुरु असलेल्या भारत आणि इंग्लंड कसोटीत पाहुण्या इंग्लंड संघाची अवस्था बिकट झाली आहे.असं असलं तरी टीम इंग्लंडनं भारताविरोधात एक अनोखं रेकॉर्ड मात्र बनवलं आहे. हे रेकॉर्ड बनवलंय इंग्लंडच्या गोलंदाजांनी.
IND Vs ENG: चेन्नईमध्ये सुरु असलेल्या भारत आणि इंग्लंड कसोटीत पाहुण्या इंग्लंड संघाची अवस्था बिकट झाली आहे. दोन दिवसाच्या खेळानंतर इंग्लंड सामना गमावण्याच्या स्थितीत आहे. असं असलं तरी टीम इंग्लंडनं भारताविरोधात एक अनोखं रेकॉर्ड मात्र बनवलं आहे. हे रेकॉर्ड बनवलंय इंग्लंडच्या गोलंदाजांनी. इंग्लंडनं या कसोटीच्या पहिल्या डावात भारताला एकही अतिरिक्त रन दिलेली नाही. असं करताना इंग्लंडनं टीम इंडियाचंच रेकॉर्ड मोडलंय हे विशेष.
इंग्लंडनं भारताचा पहिला डाव 329 धावांवर रोखला. इंग्लंडनं 95.5 ओव्हर या डावात केल्या ज्यात एकही अतिरिक्त धाव दिली नाही. या आधी हे रेकॉर्ड भारताच्या नावे होतं. भारतानं 1955 मध्ये लाहोरमध्ये पाकिस्तान विरोधात 187.5 ओव्हरमध्ये 328 रन दिलेल्या, ज्यात एकही अतिरिक्त रन दिलेली नव्हती. त्यावेळी भारतानं इंग्लंडचं रेकॉर्ड तोडलं होतं. इंग्लंडनं 1931 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध डरबनमध्ये 130.4 ओव्हरमध्ये 252 रन दिल्या होत्या, ज्यात एकही अतिरिक्त रन दिलेली नव्हती.
दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाची पकड मजबूत
गोलंदाजांनी केलेल्या दमदार कामगिरीमुळे भारताने चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या कसोटीत आपली पकड मजबूत बनवली आहे. इग्लंडचा पहिला डाव केवळ 134 धावांवर आटोपल्यानंतर टीम इंडियाने दुसऱ्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत आपल्या दुसऱ्या डावात एक विकेट गमावत 54 धावा केल्या. त्यामुळे सामन्याच्या दुसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियाकडे एकूण 249 धावांची आघाडी आहे. दुसऱ्या दिवशीचा खेळ संपला त्यावेळी रोहित शर्मा 25 तर पुजारा 7 धावांवर खेळत आहेत. रोहित शर्माने दुसर्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 161 धावांची शानदार खेळी केली. तसेच अजिंक्य रहाणे (67) आणि ऋषभ पंत (नाबाद 58) धावा करत टीम इंडियाला तीनशेपार पोहोचवले होते. त्यानंतर आलेल्या इंग्लंडच्या संघाला अवघ्या 134 धावांत गुंडाळत भारतानं मजबूत आघाडी घेतली आहे. इंग्लंडकडून फोक्सनं सर्वाधिक 42 धावा बनवल्या. आर अश्विननं पहिल्या डावात इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत पाठवला. अश्विननं पाच, अक्षर-इशांतनं 2-2 तर सिराजनं एक विकेट घेतली.