एक्स्प्लोर
Advertisement
भारत वि. ऑस्ट्रेलिया : पुण्यात चुरशीची लढत
पुणे : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेला पुण्यातून सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. पुण्यातील गहुंजे स्टेडिअमवर उभय संघ भिडणार आहेत.
श्रीलंकेवर 2-1 अशी मात, दक्षिण आफ्रिकेला 3-0 नं लोळवलं, वेस्ट इंडीजमध्ये 2-0 असा विजय, न्यूझीलंडचा 3-0 असा धुव्वा, इंग्लंडवर 4-0 ने मात,आणि बांगलादेशविरुद्ध एकमेव कसोटीतही विजय हा टीम इंडियाचा विजयरथ ऑस्ट्रेलियाविरुद्धही कायम राखण्याचं विराट ब्रिगेडसमोर आव्हान असेल.
विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली भारतानं सलग सहा कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम गाजवला. पण टीम इंडियाला आता सर्वात मोठ्या कसोटीला सामोरं जायचं आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेची पहिली लढाई पुण्यात खेळवली जाणार आहे.
एरवी भारत आणि ऑस्ट्रेलियामधली कसोटी मालिका म्हटलं, की नजरेसमोर येते दोन्ही संघांमधली खुन्नस. शेन वॉर्न आणि सचिन तेंडुलकरमधलं द्वंद्व, कोलकाता कसोटीत फॉलोऑन मिळाल्यावरही राहुल द्रविड व्हीव्हीएस लक्ष्मणनं मिळवून दिलेला विजय, अॅडलेड टेस्टमधली द्रविडची मॅचविनिंग खेळी, 2008 साली मालिका गमावल्यावर मुंबई कसोटीत 93 धावांत ऑस्ट्रेलियाचा उडालेला खुर्दा आणि पर्थमध्ये 2008 सालचा यादगार विजय, अँड्र्यू सायमंड्स आणि हरभजन सिंगमधली चकमक.
मैदानावरची चुरस आणि खेळाडूंमधली टशन यांमुळं गेल्या दोन दशकांत भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधली प्रत्येक कसोटी मालिका चुरशीची ठरली. पण यंदा चित्र थोडं वेगळं आहे. कारण यंदा भारत नाही तर ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर आहे. मुंबईत सराव सामन्याआधी स्टीव्हन स्मिथच्या पत्रकार परिषदेत तरी तेच चित्र दिसून आलं होतं. ब्रेबॉर्नवरील सराव सामन्यातही तेच जाणवलं.
चॅपेल बंधूंपासून, स्टीव्ह वॉ, रिकी पॉन्टिंग आणि मायकल क्लार्कसारखा स्टीव्हन स्मिथ ऑस्ट्रेलियन कर्णधार म्हणून आक्रमक वाटत नाही. पण स्मिथच्या टीममध्ये गुणवत्तेची कमी नाही. त्यामुळं विजयरथावर आरूढ झालेली टीम इंडियाही ऑस्ट्रेलियाला कमी लेखण्याची चूक करणार नाही.
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधल्या या मालिकेत आयसीसीच्या कसोटी क्रमवारीतलं अव्वल स्थानही पणाला लागलं आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सध्या भारत 121 गुणांसह पहिल्या आणि ऑस्ट्रेलिया 109 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियानं भारताला 3-0 किंवा 4-0 असं हरवलं, तर भारताला कसोटी क्रमवारीतलं अव्वल स्थान गमवावं लागू शकतं. त्यामुळं पुणे कसोटी जिंकून सुरुवातीलाच या मालिकेत आघाडी घेण्याचा टीम इंडियाचा इरादा राहील.
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधल्या या लढतीमुळं पुण्याला पहिल्यांदाच कसोटी सामन्याचं यजमानपद मिळालं आहे. त्यामुळं पुणेकर चाहत्यांमध्येही या कसोटीविषयी उत्सुकता आहे. आता गहुंजे स्टेडियमवरची ही लढाई जिंकून विराटची टीम पुणेकर चाहत्यांना विजयाचं गिफ्ट देणार का हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.
संघ :
भारत : मुरली विजय, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रिद्धीमान साहा, आर अश्विन, रवींद्र जाडेजा, जयंत यादव, इशांत शर्मा, उमेश यादव.
ऑस्ट्रेलिया : स्टीव स्मिथ (कर्णधार) डेव्हिड वॉर्नर, अॅश्टन अॅगर, जॅक्सन बर्ड, पीटर हँड्सकॉम्ब, जोस हेजलवुड, उस्मान ख्वाजा, नाथन लॉयन, मिशेल मार्श, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, स्टीवन ओ कॅफे, मॅथ्यू रेनशॉ, मिशेल स्टार्क, मिशेल स्वेपसन, मॅथ्यू वेड (विकेटकीपर).
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
क्रिकेट
Advertisement