एक्स्प्लोर
Advertisement
मेसीच्या अर्जेंटिनावर साखळीतच गारद होण्याची वेळ कशामुळे?
अर्जेंटिनाचा कर्णधार लायनेल मेसीला दोन सामन्यांमध्ये मिळून एकही गोल करता आला नाही. त्यामुळे अर्जेंटिनाला गटातूनच गाशा गुंडाळावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मुंबई : गतवेळच्या उपविजेत्या अर्जेंटिनावर यंदाच्या विश्वचषकात गटांगळ्या खाण्याची वेळ आली. अर्जेंटिनाला सलामीच्या सामन्यात आईसलँडने 1-1 असं बरोबरीत रोखलं होतं. मग क्रोएशियाने अर्जेंटिनाचा 3-0 असा धुव्वा उडवला. अर्जेंटिनाचा कर्णधार लायनेल मेसीला दोन सामन्यांमध्ये मिळून एकही गोल करता आला नाही. त्यामुळे अर्जेंटिनाला गटातूनच गाशा गुंडाळावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अर्जेंटिना साखळीतच गारद होणार?
क्रोएशियाचे वीर एकामागून एक तीन तीन गोल डागत असताना लायनेल मेसी किंवा त्याच्या शिलेदारांवर निव्वळ बघ्याचीच भूमिका घेण्याची वेळ आली. त्याचा परिणाम होता क्रोएशियाकडून अर्जेंटिनाचा 3-0 असा धुव्वा.
आता खेळाच्या मैदानात हारजीत ही असायचीच… मॅराडोनाला हे काही आम्ही सांगण्याची गरज नाही. पण अर्जेंटिनाच्या पराभवानंतर त्याने केस उपटायचे तेवढे शिल्लक ठेवले. कारण, अर्जेंटिनाने क्रोएशियासमोर घातलेल्या लोटांगणाने विश्वचषकाच्या ड गटाची सारी समीकरणंच बदलली. क्रोएशियाने सलग दुसऱ्या विजयासह ड गटातून बाद फेरीचं तिकीट बूक केलं. त्यामुळे संभाव्य विजेत्या अर्जेंटिनावर चक्क साखळीतच गारद होण्याची वेळ येणार असं दिसत आहे.
अर्जेंटिनाचं असं का झालं?
विश्वचषकाच्या इतिहासात 1978 आणि 1986 साली विजेता, तर 1930, 1990 आणि 2014 साली उपविजेता ठरलेल्या अर्जेंटिनावर ही वेळ का यावी? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
फुटबॉलच्या दुनियेत आजच्या जमान्याचा एक हीरो अशी लायनेल मेसीची ओळख आहे. त्याच मेसी आणि त्याच्या अर्जेंटिनावर नामुष्कीची वेळ का यावी?
अर्जेंटिनाच्या टीकाकारांचा मुद्दा मान्य केला तर, त्यांनी मेसी अँड कंपनीच्या अपयशाचं खापर प्रामुख्याने प्रशिक्षक सॅम्पावली यांच्या रणनीतीवर फोडलं आहे. सॅम्पावली यांनी याआधी अर्जेंटिनाचे प्रशिक्षक या नात्याने मिळवलेलं यश हे वैयक्तिक कौशल्याऐवजी सांघिक ताकद लक्षात घेऊन आखलेल्या रणनीतीला होतं. पण या विश्वचषकासाठी त्यांनी लायनेल मेसीला केंद्रस्थानी मानून त्याच्याभोवती संघाची उभारणी केली होती.
अर्जेंटिनाची बदललेली व्यूहरचना अंगाशी?
अर्जेंटिनाचा आईसलँडविरुद्धचा सामना बरोबरीत सुटल्याने अधिकच बिथरलेल्या सॅम्पावली यांनी फुटबॉलचं बूक टराटरा फाडलं असावं. कारण, त्यानंतर त्यांनी रचलेली व्यूहरचना ही धाडसी असली तरी धाडस आणि मूर्खपणा यांच्यामधल्या पुसटशा सीमारेषेवरची ती रणनीती होती. सॅम्पावली यांनी 4-2-3-1 ऐवजी 3-4-3 अशी व्यूहरचना वापरली. त्यामुळे अर्जेंटिनाचा बचाव वारंवार भेदणं क्रोएशियाला शक्य झालं, असा जाणकारांचा दावा आहे. एखाद्या संघाची नियमित व्यूहरचना बदलायची तर नव्या व्यूहरचनेचा आधी कसून सराव करणं आवश्यक आहे. आणि सरावाअभावी काय होतं ते अर्जेंटिनाच्या पराभवातून दिसलं.
गोलरक्षक विल्फ्रेडो कॅबालेरोच्या घोडचुकीचाही अर्जेंटिनाला मोठा फटका बसला. त्याने 53 व्या मिनिटाला आपला सहकारी गॅब्रिएल मर्काडोला पास देण्याच्या नादात क्रोएशियाच्या रेबिचला गोल करण्यासाठी आयती संधी दिली. रेबिचच्या व्हॉलीवर चेंडू गोलपोस्टमध्ये जाऊन थडकला, त्यावेळी कॅबालेरोला आपली चूक किती मोठी आहे याची कल्पना आली असावी.
क्रोएशियाच्या लुका मॉडरिचच्या दुसऱ्या गोलने तर अर्जेंटिनाच्या आत्मविश्वासवरच मोठा घाव घातला. त्याच्या या गोलने अर्जेंटिनाचं अवसान इतकं गळलं की, क्रोएशियाच्या रॅकिटिचने विनासायास तिसरा गोल डागला.
अर्जेंटिना संघात ऑन आणि ऑफ द फिल्ड अराजक माजलंय?
अॅटलेटिको माद्रिदचे प्रशिक्षक दियागो सिमिऑनी यांनी तर अर्जेंटिना संघात ऑन आणि ऑफ द फिल्ड अराजक माजलं असल्याचा आरोप केला. सिमिऑनी यांनी एका जमान्यात अर्जेंटिनाचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्यामुळे त्यांच्या मताला महत्त्व आहे. अर्जेंटिनाचा संघ नेतृत्त्वहीन असल्याचं मत व्यक्त करुन त्यांनी लायनेल मेसीला लक्ष्य केलं आहे. मेसी हा चांगला फुटबॉलपटू आहे, पण एफसी बार्सिलोनाकडून खेळताना यशस्वी ठरतो, याचं कारण त्याच्या आजूबाजूला असामान्य गुणवत्तेचे फुटबॉलवीर असतात, असा मुद्दा सिमिऑनी यांनी मांडला आहे. आपल्या पसंतीच्या संघात मेसीऐवजी रोनाल्डोला संधी देऊ, असं थेट वक्तव्यही त्यांनी केलं.
मेसी आणि अर्जेंटिनाच्या कामगिरीवर कठोर भाष्य करणारे दियागो सिमिऑनी अर्जेंटिनाचं विश्वचषकातलं आव्हान मोडीत काढायला तयार नाहीत. अर्जेंटिनाचं यंदाच्या विश्वचषकाचं गणित गंडलं असल्याचं थेट विधान करून ते म्हणतात की, अर्जेंटिना ही अर्जेंटिना आहे. फुटबॉलच्या मैदानात अर्जेंटिनाचा भरवसा देता येत नाही. त्यामुळे मेसी आणि त्याच्या अर्जेंटिनाच्या चाहत्यांनी तेवढ्या एका गोष्टीसाठी सिमिऑनीना तुमच्या तोंडात साखर पडो, असं म्हटलं तर नवल वाटणार नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
सांगली
Advertisement