राजस्थानच्या दीपक चहरची तीन दिवसांत दुसरी हॅटट्रिक, मुश्ताक अली टी20त विदर्भाविरुद्ध हॅटट्रिक
राजस्थाननं विदर्भासमोर 13 षटकांत 109 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना 13-13 षटकांचा खेळवण्यात आला होता. 109 धावांचं आव्हान घेऊन उतरलेल्या विदर्भाला चहरच्या भेदक माऱ्यासमोर नऊ बाद 99 धावांचीच मजल मारता आली.
मुंबई : टीम इंडियानं रविवारी नागपूरमध्ये बांगलादेशविरुद्धच्या अखेरच्या ट्वेन्टी ट्वेन्टीत 30 धावांनी विजय साजरा करुन मालिका खिशात घातली. टीम इंडियाच्या या मालिकाविजयाचा हीरो ठरला होता तो वेगवान गोलंदाज दीपक चहर. चहरनं त्या सामन्यात हॅटट्रिकसह सहा विकेट्स घेतल्या होत्या. याच चहरनं त्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत आणखी एक हॅटट्रिक घेतली आहे.
दीपक चहरनं सध्या सुरु असलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी ट्वेन्टी स्पर्धेत राजस्थान विरुद्ध विदर्भ या सामन्यात हा पराक्रम गाजवला. राजस्थानकडून खेळणाऱ्या चहरनं विदर्भच्या डावातल्या 13व्या षटकांत चौथ्या चेंडूवर दर्शन नालकंदे, पाचव्या चेंडूवर श्रीकांत वाघ आणि सहाव्या चेंडूवर अक्षय वाडकरला माघारी धाडून हॅटट्रिक साजरी केली. दीपक चहरची गेल्या तीन दिवसांतली ही दुसरी हॅटट्रिक ठरली.
या सामन्यात राजस्थाननं मनेंद्र सिंगच्या 44 धावांच्या खेळीमुळे विदर्भासमोर 13 षटकांत 109 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना 13-13 षटकांचा खेळवण्यात आला होता. त्यामुळे विदर्भाला 13 षटकांत 100 धावांचं आव्हान मिळालं होतं. हे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या विदर्भाला चहरच्या भेदक माऱ्यासमोर नऊ बाद 99 धावांचीच मजल मारता आली. चहरनं या सामन्यात तीन षटकांत अठरा धावा देत चार फलंदाजांना माघारी धाडलं. याशिवाय खलील अहमद, अनिकेत चौधरी, चंद्रपाल सिंग आणि महिपाल लोमरोरनं प्रत्येकी एक विकेट घेतली. या कामगिरीमुळे राजस्थाननं हा सामना व्हीजेडी नियमानुसार अवघ्या एका धावेने जिंकला.
दोनच दिवसांपूर्वी चहरनं नागपूरमध्ये झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक ट्वेन्टी ट्वेन्टीत हॅटट्रिक नोंदवली होती. चहरनं ही हॅटट्रिक नोंदवून ट्वेन्टी ट्वेन्टी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचा पहिला हॅटट्रिकवीर होण्याचा मान मिळवला होता. त्याचबरोबर त्यानं या सामन्यात तीन षटक आणि दोन चेंडूत अवघ्या सात धावांत सहा विकेट्स घेतल्या होत्या. ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेटमधली ही आजवरची सर्वोत्तम कामगिरी ठरली होती.
दीपक चहरनं आजवर एक वन डे, सात ट्वेन्टी ट्वेन्टी आंतरराष्ट्रीय सामन्यांत भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्याच्याकडे 45 प्रथम श्रेणी आणि 44 लीस्ट ए सामने खेळण्याचाही अनुभव आहे. याशिवाय दीपक चहरनं आजवर 66 ट्वेन्टी ट्वेन्टी सामने खेळले आहेत.