(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबईची निराशाजनक सुरुवात, दिल्ली कॅपिटल्सकडून मुंबई इंडियन्सचा 37 धावांनी पराभव
दिल्लीने मुंबईविरुद्ध 20 षटकांत 214 धावांचा डोंगर उभारला होता. मात्र मुंबईचा संघ अवघ्या 176 धावांत ऑलआऊट झाला.
मुंबई : आयपीएलच्या बाराव्या मोसमात मुंबई इंडियन्सची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा दिल्ली कॅपिटल्सने 37 धावांनी पराभव केली आहे. दिल्लीने मुंबईविरुद्ध 20 षटकांत 214 धावांचा डोंगर उभारला होता. मात्र मुंबईचा संघ अवघ्या 176 धावांत ऑलआऊट झाला.
मुंबईकडून युवराज सिंगने सर्वाधिक 53 धावांची एकाकी झुंज दिली. तर कृणाल पंड्याने 32, क्विंटन डिकॉकने 27, कायरन पोलार्डने 21 धावांची खेळी केली. सलामीला उतरलेल्या मुंबईचा कर्णधार रोहित शर्मामा नावाला साजेशी अशी कामगिरी करत आली नाही. रोहित अवघ्या 14 धावांवर बाद झाला. दिल्लीकडून इशांत शर्मा आणि कॅगिसो राबाडाने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. तर ट्रेन्ड बोल्ट, राहुल तेवातिया, अक्षर पटेल, आणि कीमो पॉलने प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
त्याआधी प्रथम फंलदाजीला उतरलेल्या दिल्ली कॅपिटल्सने 213 धावांचं आव्हान मुंबईसमोर ठेवलं होतं. दिल्लीकडून रिषभ पंतने तडाखेबाज फलंदाजी करत अवघ्या 27 चेंडूत 78 धावा कुटल्या. तर कॉलिन इनग्रामने 47 आणि शिखर धवनने 43 धावांचं योगदान दिलं. मुंबईकडून मिशेल मॅक्लेनघनने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. तर जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या आणि बेन कटिंगने प्रत्येक एक विकेट घेतली.