Kohli Leaves T20 Captaincy: टी -20 वर्ल्डकपनंतर टी -20 फॉरमॅटमध्ये कर्णधारपद सोडणार, विराट कोहलीची मोठी घोषणा!
विराट कोहलीच्या चाहत्यांसाठी महत्वाची बातमी आहे. विराट कोहलीने टी 20 टीमच्या कर्णधारपदासंदर्भात मोठी घोषणा केली आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने सोशल मीडियावरील एका पोस्टद्वारे घोषणा केली आहे की, आगामी 2021 टी 20 विश्वचषकानंतर टी -20 फॉरमॅटमध्ये तो टीम इंडियाच्या कर्णधारपदाचा राजीनामा देणार आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये विराट कोहली म्हणाला की, त्याने हा निर्णय अत्यंत काळजीपूर्वक घेतला आहे. कामाचा ताण लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे त्याने सांगितले आहे.
कोहली म्हणाला, की "मी टी -20 फॉरमॅटमध्ये कर्णधारपद सोडण्याचा निर्णय माझ्या जवळचे लोक मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि रोहित शर्मा यांच्याशी चर्चा केल्यानंतर घेतला आहे." माझ्या कर्णधारपदाच्या काळात मी संघाला खूप काही दिले आहे. कामाचा ताण पाहता, मी 2021 च्या टी 20 विश्वचषकानंतर टी -20 स्वरूपातील भारताचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पण एक फलंदाज म्हणून मी संघाला पाठिंबा देत राहीन.”
View this post on Instagram
कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये कोहली कर्णधार असेल
कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी विराट कोहलीने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने हे स्पष्ट केले आहे की, तो वनडे आणि कसोटीत भारताच्या कर्णधारपदी तो कायम राहील. त्याने रोहितला टी -20 फॉरमॅटमध्ये कर्णधार करण्याचं सुचवलं आहे. त्याने रोहितच्या नेतृत्व गुणवत्तेचीही प्रशंसा केली.
2017 मध्ये कोहली कर्णधार
उल्लेखनीय म्हणजे, 2017 मध्ये कोहलीला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये पूर्णवेळ कर्णधार बनवण्यात आले. त्याच्या कर्णधारपदाखाली टीम इंडियाची टी -20 फॉरमॅटमधील कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. कोहलीने 45 टी -20 सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे, त्यापैकी टीम इंडियाने 29 सामने जिंकले आहेत. आणि 14 सामन्यांमध्ये त्याला पराभवाला सामोरे जावे लागले आहे.