T20 World Cup 2024: टीम इंडियाला टी-20 विश्वचषक जिंकायचा असल्यास 3 गोष्टी कराव्या लागतील...; समजून घ्या समीकरण!
T20 World Cup 2024: 2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारताला एकही आयसीसी स्पर्धा जिंकता आलेली नाही.
T20 World Cup 2024: भारतीय संघ टी-20 विश्वचषकाच्या (T20 World Cup 2024) सुपर-8 मध्ये पोहोचेपर्यंत एकही सामना हरला नव्हता, पण खरी कसोटी आता सुरू होणार आहे. यूएसएच्या खेळपट्ट्या आतापर्यंत गोलंदाजीसाठी अनुकूल होत्या, ज्याचा जसप्रीत बुमराह आणि इतर भारतीय वेगवान गोलंदाजांनी पुरेपूर फायदा घेतला. एकेकाळी पाकिस्तान आणि अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा धोका होता. म्हणजे संघात नक्कीच काही त्रुटी आहेत. ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडचा सध्याची कामगिरी पाहता भारताचे विश्वविजेते होण्याचे स्वप्न भंग होऊ शकते. 2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारताला एकही आयसीसी स्पर्धा जिंकता आलेली नाही. अशा परिस्थितीत भारतीय संघाला ज्या तीन गोष्टींवर विशेष काम करण्याची गरज आहे.
1. विराट कोहलीला धावा कराव्या लागतील-
विराट कोहली टी-20 वर्ल्ड कपच्या सुरुवातीपासूनच रोहित शर्मासोबत ओपनिंग करताना दिसत आहे. सलामीची फलंदाजी कोहलीला अजिबात शोभणारी नाही हे स्पष्ट झाले आहे. 3 सामन्यांमध्ये, तो केवळ 9 चेंडूत क्रीजवर राहू शकला, ज्यामध्ये त्याने केवळ 5 धावा केल्या. त्यामुळे आगामी सर्व सामन्यात विराट कोहलीला धावा करणं महत्वाच असणार आहे.
2. संघात कुलदीप किंवा चहलला सामील करणं-
भारताकडे T20 विश्वचषक संघात कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहलच्या रूपाने दोन मनगट फिरकीपटू आहेत, तरीही त्यांचा अद्याप वापर झालेला नाही. आता विश्वचषकाचे सर्व सामने वेस्ट इंडिजमध्ये होणार असून येथील खेळपट्टी फिरकी गोलंदाजीसाठी योग्य असू शकते. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात आदिल रशीदने दाखवून दिले की मनगटाची फिरकी गोलंदाजी येथील खेळपट्ट्यांवर खूप प्रभावी ठरू शकते. एकीकडे इंग्लंडचे सर्व गोलंदाज मार खात होते, तर दुसरीकडे राशिदनेही 4 षटकात केवळ 21 धावा देत 1 बळी घेतला. गोलंदाजीत वैविध्य येण्यासाठी टीम इंडियाने कुलदीप किंवा चहलला प्लेइंग इलेव्हनमध्ये ठेवणे आवश्यक आहे.
3. मधल्या फळीतील फलंदाजीत सातत्य
रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या रूपाने भारताचे सलामीचे फलंदाज विश्वचषकात पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. मात्र, 3 व्या क्रमांकावर खेळत असलेल्या ऋषभ पंतने सर्व सामन्यांमध्ये संयमी फलंदाजी केली आहे. मात्र सलामीच्या जोडीच्या अनुपस्थितीमुळे मधल्या फळीतील फलंदाजांवर दडपण आहे. अशा परिस्थितीत सूर्यकुमारला एका अर्धशतकाशिवाय इतर 2 डावात केवळ 9 धावा करता आल्या आहेत. कधी अक्षर पटेल तर कधी शिवम दुबेला वरच्या क्रमाने फलंदाजीसाठी पाठवले जात आहे. मधल्या फळीतील फलंदाजीचे कॉम्बिनेशन काय असावे हेच जणू संघ व्यवस्थापनाला माहीत नाही. भारताला विश्वविजेते व्हायचे असेल तर मधल्या फळीची फलंदाजी कोणत्याही परिस्थितीत मजबूत करावी लागेल.
भारताचा संपूर्ण संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, यशस्वी जैस्वाल, कुलदीप यादव, संजू सॅमसन , युझवेंद्र चहल