T20 World Cup 2024 IND vs AFG: एक नव्हे...दोन सुपर ओव्हर; भारत अन् अफगाणिस्तानचा शेवटचा सामना झाला होता थरारक, नेमकं काय घडलेलं?
T20 World Cup 2024 IND vs AFG: बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर भारत आणि अफगाणिस्तानचा याआधी शेवटचा सामना झाला होता.
T20 World Cup 2024 IND vs AFG: टी20 विश्वचषक 2024 मध्ये (T20 World Cup 2024) आज म्हणजेच 20 जून रोजी भारत आणि अफगाणिस्तान (Ind vs Afg) सुपर-8 सामन्यात आमनेसामने येतील. T20 विश्वचषक 2024 ची उपांत्य फेरी लक्षात घेऊन, दोन्ही संघांना सुपर-8 टप्प्याची सुरुवात विजयाने करायची आहे. टी-20 क्रमवारीवर नजर टाकली तर भारत पहिल्या क्रमांकावर आहे, तर अफगाणिस्तान दहाव्या स्थानावर आहे, मात्र राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान संघाने विश्वचषकात धुमाकूळ घातला आहे. भारत आणि अफगाणिस्तान जेव्हा शेवटचे आमनेसामने आले तेव्हा काय झाले होते माहीत आहे का? त्यांचा सामना इतका रोमांचक होता की त्याचा निकाल एक नव्हे तर दोन सुपर ओव्हरनंतर लागला.
नेमकं काय घडलेलं?
बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर भारत आणि अफगाणिस्तानचा हा सामना झाला होता. प्रथम खेळताना भारताने 212 धावांची मोठी धावसंख्या उभारली, त्यात रोहित शर्माच्या शतकाचाही समावेश होता. या सामन्यात रोहितने 69 चेंडूत 121 धावा करत आपल्या T20 कारकिर्दीतील पाचवे शतक झळकावले. तर रिंकू सिंगने 39 चेंडूत 69 धावांची तुफानी खेळी केली. दुसरीकडे, अफगाणिस्तानसाठी रहमानुल्ला गुरबाज, इब्राहिम झद्रान आणि गुलबदिन नायब या तिन्ही शीर्ष क्रमाच्या फलंदाजांनी अर्धशतके झळकावली. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानच्या संघाने देखील निर्धारित 20 षटकांत 212 धावा केल्या.
पहिल्या सुपर ओव्हरमध्ये काय झालं?
पहिल्या सुपर ओव्हरमध्ये अफगाणिस्तानने प्रथम खेळताना 16 धावा केल्या. भारत जेव्हा फलंदाजीला आला तेव्हा पहिल्या 2 चेंडूत फक्त 2 धावा झाल्या होत्या पण रोहित शर्माने पुढच्या 2 चेंडूत 2 षटकार मारून संघाला माघारी आणले. रोहित पाचव्या चेंडूवर बाद झाला आणि शेवटच्या चेंडूवर यशस्वी जैस्वालला एकच धाव घेता आली. पहिल्या सुपर ओव्हरनंतरही दोन्ही संघांची धावसंख्या 16 धावाच राहिली. अशा परिस्थितीत दुसरी सुपर ओव्हर घेण्यात आली.
दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये काय घडलं?
रोहित शर्माने दुसऱ्या सुपर ओव्हरच्या पहिल्या दोन चेंडूत 10 धावा केल्या होत्या, तर तिसऱ्या चेंडूवर त्याने एक धाव घेतली होती. पण पुढच्या दोन चेंडूंवर भारताने आपले दोन्ही विकेट गमावले. आता अफगाणिस्तानसमोर 12 धावांचे लक्ष्य होते. पहिल्याच चेंडूवर रवी बिश्नोईने मोहम्मद नबीला बाद केले, दुसऱ्या चेंडूवर एक धाव आली, मात्र तिसऱ्या चेंडूवर बिश्नोईने रहमानउल्ला गुरबाजलाही बाद केले. अखेर दुसऱ्या सुपर ओव्हरनंतर टीम इंडियाला विजयाची नोंद करण्यात यश आले.
भारत आणि अफगाणिस्तानची ग्रुप स्टेजमध्ये दमदार कामगिरी-
भारत आणि अफगाणिस्तानने ग्रुप स्टेजच्या सामन्यात अप्रतिम कामगिरी केली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने आयर्लंड, पाकिस्तान आणि अमेरिकेचा पराभव केला. मात्र, कॅनडाविरुद्धचा त्यांचा चौथा सामना पावसामुळे रद्द झाला. दुसरे म्हणजे, अफगाणिस्तानने पहिल्या तीन सामन्यांमध्ये युगांडा, न्यूझीलंड आणि पापुआ न्यू गिनी यांचा पराभव केला आणि शेवटच्या सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध 104 धावांनी पराभव पत्करावा लागला.
Preps ✅#TeamIndia 𝗥𝗲𝗮𝗱𝘆 𝗮𝗻𝗱 𝗥𝗮𝗿𝗶𝗻𝗴 𝗧𝗼 𝗚𝗼!💪 💪#T20WorldCup | #AFGvIND pic.twitter.com/uYOC6fyEd0
— BCCI (@BCCI) June 20, 2024