T20 World Cup 2024: आज टीम इंडिया यजमान अमेरिकेविरुद्ध भिडणार; कोणाला संधी मिळाणार?, पाहा संभाव्य Playing XI
T20 World Cup 2024 IND vs USA: भारत आणि अमेरिकेचा संघ ग्रुप अ मध्ये असून सध्या भारत पहिल्या, तर अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर आहे.
T20 World Cup 2024 IND vs USA: टी-20 विश्वचषक 2024 च्या (T20 World Cup 2024) स्पर्धेत आज भारत आणि अमेरिका (United States vs India) यांच्यात सामना रंगणार आहे. न्यूयॉर्कमधील नासाऊ मैदानावर हा सामना खेळवला जाईल. भारत आणि अमेरिकेने आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत. यामध्ये दोनही सामने भारत आणि अमेरिकेने जिंकले आहेत. भारताने पहिल्या सामन्यात आयर्लंडचा, तर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानाचा पराभव केला होता. तर अमेरिकेने पहिल्या सामन्यात कॅनडा आणि दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानला पराभूत केले होते.
भारत आणि अमेरिकेचा संघ ग्रुप अ मध्ये असून सध्या भारत पहिल्या, तर अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारत अमेरिकेला हलक्यात घेणार नाही. जर अमेरिकेला गृहीत धरण्याची चूक केली, तर भारतीयांना अडचणीचा सामना करावा लागेल. फलंदाजांना अमेरिकेविरुद्ध लय मिळवण्याची मोठी संधी मिळाली आहे. विराट कोहली अपयशी ठरला आहे, काही प्रमाणात रोहित शर्माही लौकिकानुसार कामगिरी करण्यात यशस्वी ठरलेला नाही. रवींद्र जडेजा, सूर्यकुमार यादव यांच्याकडे सुपर आठ फेरीसाठी स्वतःला तयार करण्यासाठी ही एक संधी असेल. जे खेळाडू अद्याप फॉर्ममध्ये आले नाहीत, त्यांच्याकडे अमेरिका आणि कॅनडाविरुद्धचे सामने तयारी करण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. भारत आणि अमेरिका आपल्या संघात कोणताही बदल न करण्याची शक्यता आहे.
भारताची संभाव्य Playing XI-
रोहित शर्मा, विराट कोहली, रिषभ पंत, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग
अमेरिकेची संभाव्य Playing XI
स्टीव्हेन टेलर, मोनांक पटेल, अँड्रिस गॉस, अरॉन जोन्स, नितीश कुमार, कॅरी अँडरसन, हरमीत सिंग, जसदीप सिंग, नोशतुष केनजी, सौरभ नेत्रावलकर, अली खान
पाकिस्तानचा कॅनडावर 7 विकेटनं विजय
भारत आणि अमेरिकेकडून पराभव स्वीकारल्यानंतर अखेर पाकिस्तानला सूर गवसला आहे. पाकिस्ताननं टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. कॅनडाला बाबर आझमनं फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी कॅनडाला 20 ओव्हरमध्ये 7 विकेटवर 106 धावांवर रोखलं. कॅनडाकडून अरोन जॉन्सननं 44 बॉलमध्ये 52 धावांची खेळी केली. त्यामुळं त्यांनी 106 धावांपर्यंत मजल मारली. पाकिस्ताननं मोहम्मद रिझवान आणि बाबर आझमच्या फलंदाजीमुळं कॅनडानं दिलेलं आव्हान पार केलं. दरम्यान, चार गटातून प्रत्येकी दोन संघ सुपर-8 मध्ये प्रवेश करणार आहेत. सुपर-8 मध्ये प्रवेश करणारे दोन संघ प्रत्येक गटातील पहिले दोन संघ असतील. पाकिस्तानला सुपर-8 मध्ये प्रवेश करायचा असल्यास अमेरिकेनं उर्वरित मॅचमध्ये पराभूत व्हावं लागेल आणि भारताला सर्व सामन्यांमध्ये विजय मिळवावा लागेल.