T20 World Cup 2024 Ind vs Pak: ओके...आता 30 मिनिटांनी भेटू; मुलाखतीत जसप्रीत बुमराहचं उत्तर, पत्नी संजनानेही घेतली फिरकी
T20 World Cup 2024 Ind vs Pak: सामनावीरचा पुरस्कार मिळाल्यानंतर बुमराहची मुलाखत देखील घेण्यात आली.
T20 World Cup 2024 Ind vs Pak: टी-20 विश्वचषकात (T20 World Cup 2024) काल भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात चुरशीचा सामना झाला. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 6 धावांनी पराभव केला. भारताच्या विजयात गोलंदाजीमध्ये जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्याने महत्वाची भूमिका बजावली. जसप्रीत बुमराहने 4 षटकात 14 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. या कामगिरीच्या जोरावर त्याला सामनावीरचा पुरस्कार देखील देण्यात आला. तसेच सामनावीरचा पुरस्कार मिळाल्यानंतर बुमराहची मुलाखत देखील घेण्यात आली. विशेष म्हणजे बुमराहची पत्नी आणि आयसीसीची अँकर संजना गणेशन हीनेच त्याची मुलाखत घेतली. या मुलाखतीच्या शेवटी दोघांनी एकमेकांची फिरकी घेतल्याचेही पाहायला मिळाले.
मुलाखतीत नेमकं काय झालं?
आयर्लंड सामन्यापेक्षा हे पिच वेगळे होते. सामन्यात क्षणाक्षणाला गोष्टी बदलत जात होत्या. रिझवान सामन्यात तळ ठोकून होता. त्यामुळे मी एवढाच विचार करत होतो की त्याला धावा करून द्यायच्या नाहीत. पण त्यात एक चांगली गोष्ट घडली की त्याची विकेट मला मिळाली. आम्ही आमच्या प्लॅनिंग प्रमाणेच खेळलो. यानंतर संजनाने बुमराहचे अभिनंदन केले. त्यावर ओके, आता 30 मिनिटांनी भेटूया, असं बुमहार म्हणाला. बुमराहच्या या विधानावर जेवणाचे काय?, असा प्रश्न विचारला. मात्र बुमराह काहीही न बोलता हसून निघून गेला.
View this post on Instagram
शेवटच्या दोन षटकांत थरार-
पाकिस्तानला विजयासाठी 12 चेंडूत 21 धावांची गरज होती. जसप्रीत बुमराहने 19 वे आणि अर्शदीप सिंगने 20 वे षटक टाकले. 19 व्या षटकांत बुमराहने एक विकेट्स घेत फक्त 3 धावा केल्या. त्यामुळे शेवटच्या षटकांत पाकिस्तानला विजयासाठी 18 धावांची गरज होती. अर्शदीपने पहिल्याच चेंडूत इमाद वसीमला बाद केले. यानंतर नसीम शाहने आक्रमक फटकेबाजी करत दोन चौकार लगावले, पण अर्शदीपच्या भेदक माऱ्यासमोर तोही अपयशी ठरला. अर्शदीपने 20 व्या षटकांत 11 धावा देत एक विकेट्स घेतली.
पाकिस्तानचा सातव्यांदा पराभव केला
टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात भारताचा पाकिस्तानवरचा हा सातवा विजय आहे. 2007 च्या विश्वचषकात उभय संघांमध्ये पहिला सामना झाला होता. 2024 पूर्वी, दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये 7 सामने खेळले गेले होते, त्यापैकी 6 वेळा भारतीय संघ विजयी झाला होता. मात्र या विजयानंतर टी-20 विश्वचषकात भारताचा पाकिस्तानविरुद्धचा विजय-पराजय विक्रम 7-1 असा झाला आहे.