T20 World Cup 2024: न्यूझीलंडसह तीन मोठे संघ टी 20 विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या मार्गावर; अफगाणिस्तान, अमेरिकेची दमदार कामगिरी
T20 World Cup 2024 Super 8 Qualification Chances: तीन मोठे संघ टी 20 विश्वचषक 2024 च्या स्पर्धेतून बाद होण्याची शक्यता आहे.
T20 World Cup 2024 Super 8 Qualification Chances: टी-20 विश्वचषक (ICC T20 World Cup 2024) स्पर्धेला 2 जूनपासून सुरुवात झाली. या स्पर्धेत आतापर्यंत अनेक मोठे उलटफेर झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे अनेक संघ विश्वचषकातून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहेत. भारत, दक्षिण आफ्रिका आणि स्कॉटलंड हे संघही सुपर-8 मध्ये जाणार असल्याचे दिसत आहे. पण दरम्यान, तीन मोठे संघ स्पर्धेतून बाद होण्याची शक्यता आहे. यामध्ये पाकिस्तान, इंग्लंड आणि न्यूझीलंडचा समावेश आहे.
1. पाकिस्तान
2024 च्या T20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानने आतापर्यंतचे दोन्ही सामने गमावले आहेत. प्रथम अमेरिकेकडून आणि नंतर भारताकडून पराभव पत्करावा लागला. सुपर-8 मध्ये जायचे असेल तर पुढील दोन सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील. पाकिस्तानचं टेन्शन इथेच संपणार नाही, कारण कॅनडा आणि अमेरिका पुढील सर्व सामने पराभूत होतील, ही वाट त्यांना बघावी लागेल. पाकिस्तान आणि अमेरिका या दोघांचेही प्रत्येकी चार गुण झाल्यास नेट रनरेटनुसार निर्णय घेतला जाईल. तसेच अमेरिकेचा सामना पावसामुळे रद्द झाल्यास पाकिस्तान थेट विश्वचषकातून बाहेर जाईल. त्यामुळे सध्या बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाच्या अडचणी वाढल्या आहेत.
2. इंग्लंड
ब गटात इंग्लंड संघ अडचणीत असल्याचे दिसत आहे. इंग्लंडचा स्कॉटलंडसोबतचा पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. दुसऱ्या सामन्यात इंग्लंडला 36 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. आता इंग्लंडचा 2 सामन्यांत एक गुण आहे आणि संघाचा नेट रनरेट -1.800 आहे. आता इंग्लंडला पुढील 2 सामने ओमान आणि नामिबियाविरुद्ध मोठ्या फरकाने जिंकावे लागतील. याशिवाय स्कॉटलंडला ऑस्ट्रेलियाकडून मोठ्या फरकाने पराभूत व्हावे, अशी वाट बघावी लागेल. सध्या गतविजेत्या इंग्लंडची परिस्थिती अत्यंत कठीण दिसत आहे.
3. न्युझीलंड
न्यूझीलंड गट C मध्ये आहे, 2024 च्या T20 विश्वचषक स्पर्धेतील त्यांच्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानकडून 84 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव झाला आहे. न्यूझीलंड संघाचे अजून 3 सामने बाकी असले तरी त्याचा नेट रनरेट -4.200 आहे. वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तानने आतापर्यंत आपले दोन्ही सामने जिंकले आहेत आणि ते गट क गटातील टॉप-2 मध्ये राहिले आहेत. न्यूझीलंडला सुपर-8 मध्ये जायचे असेल तर त्याला सर्व सामने जिंकावे लागतील. या गटात अजूनही बरंच काही घडू शकतं, पण यजमान वेस्ट इंडिज पुढचे दोन सामने हरेल, अशी आशा न्यूझीलंड संघाला करावी लागेल. अफगाणिस्तान, वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड हे तिघेही 4 गुणांच्या तुटीत अडकू शकतात. अशा स्थितीत सुपर-8 चा निर्णय नेट रनरेटवर आधारित असेल.
अमेरिका आणि अफगाणिस्तान सुपर 8मध्ये प्रवेश करणार-
टी-20 विश्वचषक स्पर्धेतील अ गटाबद्दल बोलायचे झाल्यास तर यजमान अमेरिकेचा संघ खूप मजबूत स्थितीत असल्याचे दिसते. या संघाने 2 विजय नोंदवून 4 गुण मिळवले आहेत. जर पुढील 2 पैकी एक सामना अमेरिकेने जिंकला आणि कॅनडाला एक पराभव पत्करावा लागला तर अमेरिका सुपर-8 साठी पात्र होईल. चांगल्या नेट रन-रेटमुळे, अमेरिका 4 गुणांसह पुढील फेरीत जाऊ शकते. दुसरीकडे, क गटात, अफगाणिस्तान सध्या सुपर-8 मध्ये जाण्याचा प्रबळ दावेदार असल्याचे दिसत आहे. अफगाणिस्तानने पुढील दोन सामन्यांपैकी एकही सामना जिंकला तर त्याचे सुपर-8मधील स्थान जवळपास निश्चित होईल.