IND vs AFG : अफगाणिस्तान विरुद्ध टीम इंडियाची विशेष रणनीती? रोहित शर्मा अन् विराट कोहली 'वेस्ट इंडिज'चा फॉर्म्युला वापरणार
IND vs AFG : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सुपर 8 मधील मॅच 20 जूनला होणार आहे. या मॅचकडे सर्व चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
सेंट ल्यूसिया : भारत आणि अफगाणिस्तान ( IND vs AFG) यांच्यात सुपर 8 मधील मॅच 20 जूनला होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार ही मॅच रात्री 8 वाजता सुरु होईल. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्त्वात टीम इंडियानं (Team India) सुपर 8 मध्ये एंट्री केलेली आहे. सुपर 8 मध्ये भारताचे सामने अफगाणिस्तान, बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया यांच्या विरुद्ध आहेत. भारतीय संघाला सुपर 8 मधील दोन लढतींमध्ये विजय मिळाला तरी उपांत्य फेरीत प्रवेश मिळणार आहे. टीम इंडिया राशिद खानच्या नेतृत्त्वाखालील अफगाणिस्तान संघासोबत लढण्यासाठी सज्ज झाली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारताच्या डावाची सुरुवात केलेली आहे. ग्रुप स्टेजमध्ये या जोडीला यश मिळालं नसलं तरी सुपर 8 मध्ये त्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची आशा आहे.
टीम इंडिया 'वेस्ट इंडिज'चा फॉर्म्युला वापरणार
अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यात ग्रुप स्टेजमधील अखेरची मॅच झाली. या मॅचमध्ये वेस्ट इंडिजच्या जॉन्सन चार्ल्स आणि निकोलस पूरन या दोघांनी अफगाणिस्तानच्या वेगवान गोलंदाजांवर हल्लाबोल केला होता. फजलहक फारूकी आणि आझमतुल्लाह ओमरझाई यांच्या गोलंदाजीची वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी धुलाई केली होती. वेस्ट इंडिजनं पहिल्या सहा ओव्हरमध्ये 92 धावा केल्या होत्या. त्यानंतर अफगाणिस्तानच्या राशिद खान आणि नूर अहमद यांच्या गोलंदाजीच्या वेळी वेस्ट इंडिजच्या धावांचा वेग मंदावला होता. अफगाण फिरकीपटूंची गोलंदाजी संपल्यानंतर वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा जोरदार फटकेबाजी सुरु केली होती.वेस्ट इंडिजनं अफगाणिस्तान विरुद्ध 5 विकेटवर 218 धावा केल्या होत्या.
रोहित अन् विराट अफगाणिस्तान विरुद्ध तिचं रणनीती वापरणार
रोहित शर्मा आणि विराट कोहली अफगाणिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज या मॅचमधून धडा घेत विशेष रणनीती राबवण्याची शक्यता आहे. अफगाणिस्तान विरुद्ध फलंदाजी करताना त्यांच्या वेगवान गोलंदाजांविरुद्ध आक्रमकपणे फटकेबाजी केल्यास भारताला फायदा होऊ शकतो.
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी ग्रुप स्टेजमध्ये भारताच्या डावाची सुरुवात केली होती. सुपर 8 मध्ये देखील त्यामध्ये बदल होण्याची शक्यता कमी आहे. वेस्ट इंडिजमधील खेळपट्ट्या अमेरिकेच्या तुलनेत चांगल्या असल्यानं फलंदाजांना फटकेबाजी करता येऊ शकते.
दरम्यान, भारत विरुद्ध बांगलादेश मॅच 22 जून आणि भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मॅच 24 जूनला होणार आहे. भारताकडे 2007 नंतर पुन्हा एकदा टी 20 वर्ल्ड कप जिंकण्याची संधी आहे.
संबंधित बातम्या :
T20 World Cup 2024: भारत-अफगानिस्तान सामन्यात पावसाने खोळंबा घातला तर...