फक्त हार्दिक नव्हे, राहुल अन् पंतही प्लॅनमध्ये नाहीत, श्रीलंका दौऱ्यात मिळाले भविष्यातील कर्णधाराचे संकेत
Shubhman Gill Team India Future Captain : आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी शुभमन गिल याच्याकडे टी20 आणि वनडेमधील उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. शुभमन गिल पुढील भारतीय कर्णधार असेल का? असा सवाल उपस्थित होत आहे.
Shubhman Gill Team India Future Captain : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर भारतीय क्रिकेटमध्ये वेगाने हालचाली झाल्या. त्यात राहुल द्रविड यांच्यानंतर गौतम गंभीर यानं मुख्य कोच म्हणून जबाबदारी संभाळली. त्यामुळे भविष्यातील भारतीय संघाची मोट वेगळ्या पद्धतीने बांधली जाईल, असा अंदाज वर्तवला होता. तसेच काहीसे श्रीलंका दौऱ्यातील टीम इंडियाच्या निवडीनंतर समोर आले आहे. श्रीलंका दौऱ्यासाठी युवा शुभमन गिल याच्याकडे वनडे आणि टी20 संघाचे उपकर्णधारपद सोपवण्यात आले. यामधूनच शुभमन गिलकडे गौतम गंभीर भारताचा भविष्यातील कर्णधार म्हणून पाहत आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.
रोहितकडून गिल खूप काही शिकू शकतो -
गौतम गंभीर यानं मुख्य कोच म्हणून जबाबदारी स्विकारल्यानंतर शुभमन गिल याचा सुवर्णकाळ सुरु झाला आहे. टी20 विश्वचषकानंतर शुभमन गिल याला झिम्बाब्वे दौऱ्यासाठी कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले. गिलच्या नेतृत्वातील युवा टीम इंडियाने झिम्बाब्वेवर 4-1 असा विजय मिळवला. श्रीलंका दौऱ्यासाठी गिलकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात शुभमन गिल याला क्रिकेटचे चांगले धडे मिळू शकतात. शुभमन गिल रोहित शर्माकडून नेतृत्वाचे धडे मिळू शकतात. शुभमन गिल आता फक्त 24 वर्षांचा आहे, क्रिकेटमधील बारकावे शिकण्यासाठी त्याच्याकडे खूप वेळ आहे. त्यामुळे रोहित शर्मा जेव्हा क्रिकेटला रामराम करेल, तेव्हा शुभमन गिल परिपक्व झालेला असेल.
हार्दिक पांड्या आणि पंत शर्यतीतून बाहेर -
बीसीसीआयकडून हार्दिक पांड्याला डावलण्यात आले आहे. फिटनेस, दुखापत आणि वर्कलोड मॅनेजमेंटमुळे हार्दिक पांड्याला कर्णधारपदापासून दूर ठेवण्यात आले आहे. दुसरीकडे ऋषभ पंत याने सुरुवातीच्या काळात सर्वांनाच प्रभावित केले होते. पण 2022 मधील भीषण अपघातानंतर ऋषभ पंत टीम इंडियामधून दुरावला गेला. पंत आणि हार्दिक पांड्या हे दोन आघाडीचे प्रतिस्पर्धी शुभमन गिल याच्यापासून मागे राहिले.
केएल राहुल यालाही डावलण्यात आले
श्रीलंका दौऱ्यासाठी केएल राहुल याला वनडे संघाचा कर्णधार कऱण्यात येईल, अशा बातम्या येत होत्या. पण गौतम गंभीरच्या आग्रहानंतर रोहित शर्माने श्रीलंका दौऱ्यात वनडे खेळण्याचा निर्णय घेतला. पण रोहित शर्मा परतल्यानंतर केएल राहुल याला उपकर्णधार केलं जाईल, असा अंदाज वर्तवला जात होता. पण केएल राहुल यालाही डावलण्यात आले. शुभमन गिल याने आयपीएल 2024 मध्ये गुजरातचे नेतृत्व केले होते. तिथे त्याला आशिष नेहराकडून अनेक डावपेच शिकता आले आहेत. दुर्दैवीपणे गिलच्या नेतृत्वात गुजरातला आयपीएल 2024 मध्ये आठव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. पण हा कठीण काळ शुभमन गिल याला भविष्यात कामाला येऊ शकतो.
श्रीलंका दौऱ्यात शुभमन गिल याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देऊन भविष्यातील कर्णधाराचे संकेत देण्यात आले आहेत.