(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सूर्या अन् श्रेयससाठी ऑस्ट्रेलियाविरोधीतल वनडे मालिका महत्वाची, जाणून घ्या कारण
Suryakumar Yadav : विश्वचषकाआधी ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौऱ्यावर येत आहे.
Suryakumar Yadav : विश्वचषकाआधी ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौऱ्यावर येत आहे. तीन सामन्याच्या वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा झाली. आज भारतीय संघाची निवड होण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियाविरोधातील मालिका सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर यांच्यासाठी अग्निपरीक्षा असेल. कारण, आशिया चषकात दोघांनाही तितकी संधी मिळालेली नव्हती. त्यामुळे विश्वचषकाआधी ही दोन्ही खेळाडूंसाठी ऑस्ट्रेलियाविरोधातील मालिका महत्वाची आहे.
सततच्या दुखापतीमुळे अय्यरच्या निवडीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्याशिवाय सूर्यकुमार यादव याला लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. वारंवार संधी दिल्यानंतरही सूर्याला मोठी खेळी करता आली नाही. संघ व्यवस्थापन मात्र अय्यरच्या दुखापतीवर अधिक लक्ष ठेवून आहे. मधल्या फळीतील फलंदाजाने नेटमध्ये अर्धा तास सराव केला आणि नंतर 15 मिनिटे क्षेत्ररक्षण केले, ज्यामुळे श्रीलंकेविरुद्ध आशिया कप फायनलमध्ये खेळण्याची शक्यता वाढली होती. पण त्याला प्लेईंग ११ मध्ये स्थान मिळाले नाही. अय्यरने पाकिस्तानविरोधात साखळी सामन्यात कमबॅक केले होते. या सामन्यात त्याने १४ धावा केल्या होत्या. त्यानतर त्याला प्लेईंग ११ मध्ये स्थान मिळाले नाही. त्यातच त्याची दुखापत बळावली.
सूर्यकुमार यादव वनडेत वारंवार फ्लॉप जातोय. त्याच्या T-20 फॉरमॅटमधील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर संघ व्यवस्थापनाने त्याच्यावर खूप विश्वास दाखवला आहे, परंतु तो अद्याप एकदिवसीय सामन्यांमध्ये अचूक कामगिरी करू शकलेला नाही. आशिया चषकात सूर्याला बांगलादेशविरुद्ध संधी देण्यात आली होती पण तो 34 चेंडूत केवळ 26 धावा करू शकला. बॉल वळत असताना त्याने अधिक स्वीप शॉट्स आणि जोखमीचे शॉट्स खेळल्यामुळे त्याच्या बाद करण्याच्या पद्धतीवर संघ व्यवस्थापनही खूश नाही. संघ व्यवस्थापनाकडे केएल राहुल आणि इशान किशनसारखे फलंदाज आहेत पण सूर्यकुमारला वनडे संघातील स्थान टिकवून ठेवण्यासाठी लवकरात लवकर चांगली कामगिरी करावी लागेल. त्यामुळेच आगामी ऑस्ट्रेलियाविरोधीतल मालिकेत सूर्या आणि श्रेयस अय्यर यांना स्वतला सिद्द करावे लागणार आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेचं वेळापत्रक -
आशिया चषकानंतर टीम इंडिया मायदेशात ऑस्ट्रेलियाविरोधात तीन सामन्याची वनडे मालिका खेळणार आहे. पहिला एकदिवसीय सामना २२ सप्टेंबर रोजी मोहालीच्या मैदानावर रंगणार आहे. त्यानंतर २४ आणि २७ सप्टेंबर रोजी इंदौ आणि राजकोट येथे लढत होणार आहे. विश्वचषकाच्या आधी होणारी ही वनडे मालिका तयारीसाठी महत्वाची आहे.
भारताविरोधात वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाची टीम:
पॅट कमिन्स (कर्णधार), सीन एबॉट, एलेक्स कॅरी, नाथन एलिस, कॅमरून ग्रीन, जोश हेजलवुड, जॉश इंग्लिश, स्पेंसर जॉनसन, मार्नश लाबुशेन, मिचल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तनवीर संघा, मॅथ्यू शॉर्ट, स्टीव स्मिथ, मिचल स्टार्क, मार्कस स्टोइनिस, डेविड वॉर्नर, एडम जम्पा.