(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Eknath Shinde: भाजपच्या गोटात प्रचंड अस्वस्थता, एकनाथ शिंदेंची गृहखात्याची मागणी सरकार स्थापनेतील अडसर, आता काय घडणार?
CM Eknath Shinde: काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील त्यांच्या गावी गेल्यानंतरही नेहमीसारखे वागले नाहीत. त्यांच्या या अनाकलनीय कृतीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.
मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकीत प्रचंड विजय मिळाल्यानंतर महायुती सरकारचा शपथविधी मोठ्या जल्लोषात पार पडेल, अशी अपेक्षा होती. मात्र, गेल्या तीन-चार दिवसांपासून मुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रिपदावरुन निर्माण झालेल्या तिढ्यामुळे सत्तास्थापनेचा आधी सहज वाटणारे कार्य भलतेच अवघड होऊन बसले आहे. अशातच अद्याप भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा न करण्यात आल्यामुळे आता भाजपच्या गोटातील अस्वस्थता प्रचंड वाढल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे यांनी नाईलाजाने मुख्यमंत्रीपद सोडण्याची तयारी दाखवली असली तरी गृहमंत्रीपद आणि काही महत्त्वाच्या खात्यांची मागणी त्यांनी केली आहे. मात्र, भाजपने कोणत्याही परिस्थितीत गृहमंत्रीपद सोडायला नकार दिला. त्यामुळे एकनाथ शिंदे हे नाराज होऊन साताऱ्यातील दरे या आपल्या मूळगावी निघून गेले आहेत. त्यामुळे महायुती सरकारचा शपथविधी लांबवणीवर पडला आहे.
एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपदासोबत सरकारमधील एखादे प्रभावी खाते आहे. ज्या माध्यमातून त्यांना स्वतंत्र निर्णय घेता येतील. मात्र, देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्रीपद आणि अजित पवार हे अर्थखाते सोडायला तयार नाहीत. याशिवाय, अन्य कोणते खाते स्वीकारले तर एकनाथ शिंदे यांना आपल्या खात्याने घेतलेल्या निर्णयांच्या अंतिम मंजुरीसाठी मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांवर अवलंबून राहावे लागणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे हे सध्या गृहखात्याच्या मागणीवर अडून बसल्याचे सांगितले जाते.
भाजपने महसूल, उच्चशिक्षण, विधी, ऊर्जा, ग्रामविकास या महत्त्वाच्या खात्यांवरही दावा सांगितला आहे. तर अजितदादा गटाला अर्थ,नियोजन, सहकार आणि कृषी खाते मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या वाट्याला नागरी विकास, सार्वजनिक बांधकाम, उद्योग, आरोग्य ही खाती येऊ शकतात. याशिवाय, केंद्रात शिंदे गट आणि अजितदादा गटाला एक-एक मंत्रीपद मिळू शकते. या दोन मंत्रीपदांवर श्रीकांत शिंदे आणि प्रफुल पटेल यांची वर्णी लागू शकते.
एकनाथ शिंदे दरे गावात पोहोचले पण...
एकनाथ शिंदे हे शुक्रवारी तब्येत बिघडल्याचे कारण देत साताऱ्यातील आपल्या मूळगावी निघून आले होते. याठिकाणी दोन दिवस त्यांचा मुक्काम असल्याचे कळते. एरवी एकनाथ शिंदे हे दरे गावात आल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधतात. मात्र, काल एकनाथ शिंदे यांनी कोणाशीही बोलणे टाळले. एकनाथ शिंदे यांनी सत्तास्थापनेत आपला कोणताही अडसर येणार नाही, आपण भाजप नेतृत्त्वाचा कौल मान्य करु, असे सांगितले होते. मात्र, आता एकनाथ शिंदे यांनी गृहखात्याची मागणी हीच सत्तास्थापनेतील सर्वात मोठा अडसर ठरत असल्याचा समोर आले आहे.
आणखी वाचा