(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jhulan Goswami Retirement: झूलन गोस्वामीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा; आज इंग्लंडविरुद्ध खेळणार कारकिर्दीतील अखेरचा सामना
India W Tour Of England: भारतीय महिला संघाची वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी (Jhulan Goswami) लॉर्ड्सच्या (Lords) ऐतिहासिक मैदानावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणार आहे.
India W Tour Of England: भारतीय महिला संघाची वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी (Jhulan Goswami) लॉर्ड्सच्या (Lords) ऐतिहासिक मैदानावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणार आहे. इंग्लंड दौऱ्यातील एकदिवसीय मालिका तिच्या कारकिर्दीतील अखेरची मालिका असेल, असं तिनं काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केलं होतं. भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील अखेरचा आज लॉर्ड्स येथे खेळला जाणार आहे. या मालिकेतील दोन्ही सामने जिंकून भारतानं मालिका खिशात घातलीय. या मालिकेतील अखेरचा सामना जिंकून गोस्वामीला विजयी निरोप देण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल.
इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय महिला संघानं तीन सामन्यांच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात 7 विकेट्सनं विजय मिळवून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नाबाद 143 धावांच्या खेळीच्या जोरावर भारतानं दुसरा एकदिवसीय सामना जिंकत मालिकेवर कब्जा केलाय. भारत आणि इंग्लंड महिला संघ यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना लॉर्ड्स मैदानावर खेळला जाणार आहे. झुलनच्या कारकिर्दीतील हा शेवटचा सामना असेल. झुलन गोस्वामी दिर्घकाळापासून संघाबाहेर होती. परंतु, इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेत तिचं संघात पुनरागमन झालं. इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेपूर्वी तिनं विश्वचषकात भारतासाठी अखेरचा सामना खेळला होता. मात्र, तिच्या कारकिर्दीतील अखेरचा सामना खेळण्यासाठी आज ती मैदानात उतरणार आहे.
भारतासाठी 200 हून अधिक विकेट्स घेणारी एकमेव गोलंदाज
झुलननं 2002 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. तिनं तिच्या कारकिर्दीतील पहिला सामना इंग्लंडविरुद्धच खेळला होता. हा सामना चेन्नई येथे खेळला गेला. या सामन्यात तिन सात षटकात 15 धावा खर्च करून दोन विकेट्स घेतल्या होत्या. झुलन गोस्वामीनं आतापर्यंत 12 कसोटी, 203 एकदिवसीय आणि 68 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलंय. तिनं कसोटीत 44, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 253 आणि टी-20 क्रिकेटमध्ये 56 विकेट्स घेतल्या आहेत. महत्वाचं म्हणजे, ती एकदिवसीय क्रिकेटमध्ये 1000 पेक्षा अधिक धावा आणि 200 पेक्षा अधिक विकेट्स घेणारी एकमेव खेळाडू आहे.
'विश्वचषक न जिंकल्याचा खेद वाटतो'
झूलन गोस्वामी म्हणाली की, "दोनदा अंतिम फेरी गाठूनही विश्वचषक न जिंकल्याचा खेद वाटतो, पण फायनलमध्ये पोहोचल्याचा आनंदही होता. तुम्ही चार वर्ष विश्वचषकाची तयारी करता, यादरम्यान तुम्ही खूप मेहनत करता. देशासाठी विश्वचषक जिंकणं हे प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं. जेव्हा मी माझ्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली, तेव्हा मला वाटलं नव्हतं की माझी कारकीर्द इतकी मोठी असेल. पण हा प्रवास खरोखरच अद्भुत होता. मला देशासाठी इतके दिवस खेळण्याची संधी मिळाली, यासाठी मी स्वत:ला भाग्यवान समजते."
हे देखील वाचा-