IND Vs AUS : भले शाब्बास! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय, फलंदाजांच्या तुफान खेळीनंतर बिष्णोई-कृष्णाच्या गोलंदाजीचीही जादू
IND Vs AUS : भारतीय संघाने दुसऱ्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 44 धावांनी पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने 5 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे.
मुंबई : भारत (India) विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या (Australia) टी -20 मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात देखील 44 धावांनी ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील दुसरा सामना आज (26 नोव्हेंबर) तिरुवनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवण्यात आलाय ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजी दिली होती. त्यानंतर भारताने ऑस्ट्रेलियासमोर 236 धावांचे आव्हान दिले होते.
सलामीवीर यशस्वी जैस्वालने केलेल्या पाॅवरप्लेमधील तुफानी धुलाईनंतर ऋतुराज गायकवाड आणि इशान किशानच्या शानदार फलंदाजीने ऑस्ट्रेलियन गोलंदाजीची पिसे काढली. टाॅप 3 फलंदाजांनी केलेल्या तुफानी फटकेबाजीने ऑस्ट्रेलियासमोर दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने 236 धावांचे आव्हान दिले. यशस्वी जैस्वालने 53 धावांमध्ये अर्धशतक झळकावले. तर ईशान किशनने देखील 52 धावंची खेळी केली. सूर्याने 10 चेंडूत 2 षटकारांच्या मदतीने 19 धावांची खेळी केली. तर रिंकू सिंग आणि तिलक वर्मा नाबाद परतले. रिंकू सिंगने 9 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 31 धावांची नाबाद खेळी केली आणि तिलक वर्मा 2 चेंडूत 1 षटकाराच्या मदतीने 7 धावांवर नाबाद राहिला.
सुरुवातीला ऑस्ट्रेलियाची दाणादाण
236 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा संघ तिसऱ्या षटकात 35 धावांच्या धावसंख्येवर पहिला विकेट गमावल्यानंतर सुरुवातीलाच दाणादाण उडाली. रवी बिश्नोईने मॅथ्यू शॉर्टची विकेट घेऊन ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. आधीच्या सामन्यात झटपट शतक झळकावणाऱ्या जोश इंग्लिसच्या रुपात पाचव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर दुसरा धक्का बसला तेव्हा ऑस्ट्रेलिया पहिल्या विकेटमधून सावरत होता.
त्यानंतर सहाव्या षटकात 12 धावांवर ग्लेन मॅक्सवेलला बाद केले. ऑस्ट्रेलियाचा विकेट्स गमावण्याचा सिलसिला इथेच थांबला नाही, कांगारू संघाने स्टीव्ह स्मिथच्यारूपाने चौथी विकेट 8व्या षटकात गमावली, ज्याला प्रसिद्ध कृष्णाने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. यानंतर, पाचव्या विकेटसाठी मार्कस स्टॉइनिस आणि टीम डेव्हिडने 38 चेंडूत 81 धावांची जलद भागीदारी केली जी 14 व्या षटकात रवी बिश्नोईने टीम डेव्हिडला बाद करून संपवली
यानंतर काही वेळातच 15व्या षटकात मार्कस स्टॉइनिसची स्फोटक खेळी संपुष्टात आली. स्टॉइनिसने 25 चेंडूंत 2 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 45 धावांची खेळी केली. त्यानंतर 16व्या षटकात 01 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर शॉन अॅबॉट प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर बाद झाला. पहिल्या चेंडूनंतर कृष्णाने ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर आणखी एक बळी घेतला. यावेळी त्याने नॅथन एलिसला बोल्ड केले.
भारतीय गोलंदाजांनी गोलंदाजीची जादू इथेच थांबली नाही. 17 व्या षटकातील पाचव्या चेंडूवर अर्शदीप सिंगने अॅडम झम्पाला बाद केले. यानंतर अखेरची विकेट वाचवताना कर्णधार मॅथ्यू वेड 42 आणि तनवीर संघा 2 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर नाबाद माघारी परतला.
भारताच्या गोलंदांजांची जादू
भारताकडून रवी बिश्नोई आणि प्रसीध कृष्णाने प्रत्येकी 3 बळी घेतले. यादरम्यान बिश्नोईने 4 षटकात 32 धावा आणि कृष्णाने 4 षटकात 41 धावा दिल्या. याशिवाय अर्शदीप सिंग, मुकेश कुमार आणि अक्षर पटेल यांना प्रत्येकी 1 यश मिळाले.