Vijay Wadettiwar : 'शासकीय योजनेतून मतं खरेदी करण्याचा केविलवाणा प्रयत्न'; लाडकी बहिण योजनेवर विजय वडेट्टीवारांची खरमरीत टीका
Vijay Wadettiwar : लाडकी बहिण योजना जरी काढली असेल तरी या सरकारला बहिणी मतदान देणार नाही. शासकीय योजनेतून मत खरेदी करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
मुंबई : लाडकी बहिण योजना जरी काढली असेल तरी या सरकारला बहिणी मतदान देणार नाही. शासकीय योजनेतून मत खरेदी करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. आमच्या बहिणी यांना भीक घालणार नाहीत, अशी खरमरीत टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी लाडकी बहिण योजनेवर (Ladki Bahin Yojana) शिंदे सरकारवर (Shinde Government) केली.
पत्रकारांशी संवाद साधताना विजय वडेट्टीवार यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. ते म्हणाले की, मी दिक्षाभूमीला गेलो होतो. गुन्हे दाखल करण्याची गरज नाही. ही दडपशाही आहे. याबाबत पोलीस आयुक्तांशी बोलून आंदोलनकर्त्यांना ताब्यात घ्या आणि सोडा अशी विनंती केली होती, मात्र आता गुन्हे दाखल झाले असतील तर ते मागे घ्यावेत.
आमचे तीनही उमेदवार निवडून येतील
विधानपरिषद निवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. अजित पवार यांनी म्हटले की, आम्ही उमेदवार मागे घेणार नाही. महाविकास आघाडीकडून ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न करेल का? असे विचारले असता विजय वडेट्टीवार म्हणाले की, आमचे तीनही उमेदवार निवडून येतील ही खात्री आहे. तेवढं संख्याबळ आमच्याकडे आहे. त्यामुळे आम्ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा प्रश्नच नाही.
शासकीय योजनेतून मतं खरेदी करण्याचा केविलवाणा प्रयत्न
लाडकी बहिण योजनेवर विजय वडेट्टीवार म्हणाले की, लाडकी बहिण योजना जरी काढली असेल तरी या सरकारला बहिणी मतदान देणार नाही. लाडकी बहिण योजना म्हणजे सरकारी खात्यातून मत विकत घेणं आहे. आमच्या बहिणी यांना भीक घालणार नाही. शासकीय योजनेतून मत खरेदी करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. ही सद्बुद्धी त्यांना वर्षभरापूर्वी का सुचली नाही? निवडणुकीच्या तोंडावरच का सुचली? यातून काही निष्पन्न होणार नाही, असे त्यांनी यावेळी म्हटले.
सरकार शेतकऱ्यांसोबत बनवाबनवी करतंय
ते पुढे म्हणाले की, मराठवाड्यातून शेतकऱ्यांच्या 350 डीपी चोरीला गेल्या आहेत. त्यावर सरकारचचं लक्ष नाही. शेतकऱ्यांचे 4600 कोटी रुपये सरकारने दिलेले नाहीत. आपत्तीग्रस्तांच्या नावाला 15 हजार कोटी सांगत शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत. सरकार शेतकऱ्यांसोबत बनवाबनवी करत आहे. बीडमध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी एमआयडीसीच्या नावाने लाटल्या. सरकार केवळ आम्ही खोटे नेरेटिव्ह सेट केले बोलतात. आम्ही काय खोटे नेरेटिव्ह सेट केले, तुम्हीच खोटं बोललात, अशी टीका त्यांनी यावेळी सरकार केली आहे.
आणखी वाचा
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत