Britain Election Result 2024 : भारतात राज्यसभेत सासूबाई सुधा मूर्तींचं खणखणीत भाषण, तिकडे जावई ऋषी सुनक यांच्या पक्षाचा पराभव, ब्रिटनमध्ये लेबर पार्टीची सत्ता येणार
Britain Election Result 2024: हुजूर पक्षाचे नेते आणि ब्रिटनचे विद्यमान पंतप्रधान ऋषी सुनक यांनी पराभव मान्य केला आहे. लेबर म्हणजेच मजूर पार्टी आघाडीवर आहे. मतमोजणी अद्याप सुरु आहे.
Britain Election Result 2024 लंडन : ब्रिटनमध्ये 4 जुलै रोजी पंतप्रधान पदासाठी मतदान झालं होतं. या निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. आतापर्यंतच्या मतमोजणीतील कलांनुसार मजूर पक्ष (Labor Party) आघाडीवर असून हुजूर पक्ष पिछाडीवर आहे. आतापर्यंतचे कल पाहता हुजूर पक्षाचे नेते विद्यमान पंतप्रधान ऋषी सुनक (Rishi Sunak) यांनी पराभव मान्य केला आहे. सध्या मतमोजणी सुरु आहे. हुजूर पक्ष पिछाडीवर असला तर सुनक यांनी रिचमंड आणि नॉर्थहेलर्टन या जागा राखण्यात यश मिळवलं आहे. दुसरीकडे भारतात राज्यसभेत ऋषी सुनक यांच्या सासूबाई सुधा मूर्ती यांचं भाषण देखील जोरदार चर्चेत आहेत.
ऋषी सुनक यांनी मजूर पक्षानं सार्वत्रिक निवडणूक जिंकली असून कीर स्टार्मर यांना अभिनंदनासाठी फोन केल्याचं म्हटलं. सुनक यांनी आता लंडनला जाणार असून तिथं निकालाच्या दृष्टीनं चिंतन करणार असल्याचं म्हटलं. पंतप्रधान म्हणून मिळालेल्या कार्यकाळात खूप काम केलं. माझं सर्वस्व यामध्ये झोकून दिलं होतं, असं सुनक म्हणाले.
एक्झिट पोल देखील लेबर पार्टीच्या बाजूनं
मतदान झाल्यानंतर समोर आलेल्या एक्झिट पोलमध्ये देखील कीर स्टार्मर ब्रिटनचे पंतप्रधान होतील, असं सांगण्यात आलं होतं. मजूर पार्टी संसदीय निवडणुकीत बहुमतानं सत्ता मिळवेल, असं सांगण्यात आलं होतं. ऋषी सुनक यांच्या हुजूर पक्षाला मोठं नुकसान होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार मजूर पक्षाला 650 पैकी 410 जागांवर विजय मिळेल, असं सांगण्यात आलं होतं. मजूर पक्ष सत्तेत आल्यास तब्बल 14 वर्षानंतर हुजूर पक्ष सत्तेबाहेर होईल. आतापर्यतच्या मतमोजणीनुसार कल मजूर पक्षाच्या बाजूनं आहेत. सुनक यांच्या पक्षाल 131 जागा मिळण्याची शक्यता आहे. यापूर्वी त्यांच्या पक्षाला 346 जागा मिळाल्या होत्या. हुजूर पक्षाला त्यांच्या अंतर्गत वादाचा फटका बसल्याचं बोललं जातंय.
स्टार्मर यांनी मानले जनतेचे आभार
स्टार्मर यांनी मजूर पक्षाला मिळालेल्या जनतेच्या पाठिंब्याबद्दल आभार व्यक्त केले. आम्ही लोकांसाठी काम करु, ज्यांनी मतदान केलं नाही त्यांचं देखील आभार असं स्टार्मर म्हणाले. स्टार्मर यांनी आम्ही जनतेच्या मुद्यांवर बोलत राहू, जनतेसाठी दररोज लढू, बदलांसाठी तयार आहोत, असं म्हटलं. तुमच्या मतांनी बदल सुरु झाल्याचं स्टार्मर म्हणाले.
संबंधित बातम्या :