जयस्वालच्या शतकासाठी शुभमन गिलला लोकांनी ट्रोल केलं, यशस्वीनं दिलं सर्वाचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाला...
Yashasvi Jaiswal : टीम इंडियाचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल शतक पूर्ण करु न शकल्यानं कॅप्टन शुभमन गिलला नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली होती.
हरारे : भारत आणि झिम्बॉब्वे यांच्यात चौथी टी 20 मॅच काल पार पडली. या मॅचमध्ये भारतानं झिम्बॉब्वेचा (IND vs ZIM) 10 विकेटनं पराभव केला. शुभमन गिल (Shubman Gill) आणि यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) यांच्या जोडीनं भारताला दणदणीत विजय मिळवून दिला. यशस्वी जयस्वालनं नाबाद 93 धावा केल्या तर शुभमन गिल 58 धावांवर नाबाद राहिला. यशस्वी जयस्वालला शतक करण्याची संधी असताना तो करु न शकल्यानं चाहत्यांनी कॅप्टन शुभमन गिलला जबाबदार धरलं. नेटकऱ्यांनी शुभमन गिलला ट्रोल करण्यास सुरुवात केली होती. चाहते शुभमन गिलला दोषी ठरवत असताना यशस्वी जयस्वालनं या सगळ्यावर त्याची भूमिका मांडली आहे.
यशस्वीनं सांगितला सिक्रेट प्लॅन
यशस्वी जयस्वालनं या सर्व प्रकरणावर बोलताना टीम इंडियाचा सिक्रेट प्लॅन सांगितला आहे. यशस्वी जयस्वालचा व्हिडीओ देखील बीसीसीआयनं शेअर केला आहे. यशस्वी म्हणाला की आम्हाला झिम्बॉब्वेवर 10 विकेटनं विजय मिळवायचा होता. कॅप्टन शुभमन गिलला एकही विकेट गमवायची नव्हती. आम्ही त्यात यशस्वी ठरल्याचं जयस्वाल म्हणाला.
यशस्वी जयस्वाल म्हणाला की आम्हाला मॅचचा शेवट सकारात्मक करायचा होता. आम्ही त्यात यशस्वी ठरलो. एकही विकेट न गमावता विजय मिळवायचा होता, असंही यशस्वी म्हणाला.
भारतानं चौथ्या मॅचमध्ये विजय मिळवत मालिका जिंकली. याशिवाय 3-1 अशी आघाडी देखील घेतली. यशस्वी जयस्वालनं नाबाद 93 धावांची खेळी केली यात 12 चौकार आणि दोन षटकारांचा समावेश आहे. मी खेळाचा पूर्णपणे आनंद घेतला. शुभमन भाई सोबत फलंदाजी करण्याचा अनुभव चांगला होता. मला जेव्हा भारताकडून खेळण्याची संधी मिळते त्यावेळी मी त्याचा फायदा घेतो, असंही जयस्वाल म्हणाला.
भारतानं दक्षिण आफ्रिकेला टी 20 वर्ल्ड कपमध्ये फायनलमध्ये पराभूत करत विजेतेपद मिळवलं. या संघाचा सदस्य असल्याचा अभिमान वाटतो, असं देखील यशस्वी जयस्वालनं म्हटलं. टी 20 वर्ल्ड कपमध्ये अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. मला जेव्हा संधी मिळते तेव्हा चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करतो. टीमसाठी योगदान देण्याचा प्रयत्न प्रयत्न करतो. माझ्या संघाला विजय मिळवून देतो, असंही यशस्वी जयस्वालनं म्हटलं.
दरम्यान, भारत आणि झिम्बॉब्वे यांच्यात पाचवी टी 20 मॅच होणार आहे. शुभमन गिल याच्या नेतृत्त्वातील संघाकडे आजच्या मॅचमध्ये देखील विजय मिळवण्याची संधी आहे. तर , झिम्बॉब्वेचा कॅप्टन सिकंदर रझा आज विजय मिळवून मालिकेचा शेवट गोड करण्याच्या इराद्यानं मैदानात उतरु शकतो.
संबंधित बातम्या :
यशस्वी-गिलचा झंझावात, झिम्बाब्वेचा दाणादाण, भारताचा 10 विकेटने विजय, मालिकाही खिशात