Nashik : प्रजासत्ताक दिनी वनमजुराने डिझेल ओतून स्वतःला पेटवलं; नाशिकमधील धक्कादायक घटना
Nashik News : प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी वनमजुराने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथे घडला आहे.
नाशिक : प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day 2025) दिवशी वनमजुराने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिक (Nashik News) जिल्ह्यातील सटाणा (Satana) येथे घडला आहे. ताहराबाद वन परिक्षेत्राच्या कार्यालयासमोर अंगावर डिझेल ओतून वनमजूराने स्वतःला पेटवून घेतले. या घटनेत वनमजूर 80 टक्के भाजला आहे. या घटनेमुळे नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वनमजूर राजेंद्र साळुंखे हे गेल्या 20 ते 25 वर्षांपासून वनविभागात (Forest Department) वनमजूर म्हणून कार्यरत होते. मात्र त्यांना कायमस्वरूपी कामगार म्हणून घेण्यात आलेले नव्हते. त्यामुळे वनमजुराने वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी अंगावर डिझेल ओतून घेत स्वतःला पेटवून आत्मदहनाचा प्रयत्न केला.
वनमजुराच्या निकटवर्तीयांचा आरोप
वनविभागातील वनपाल सागर पाटील यांच्याकडून वन मजुरांपेक्षा कमी वेतन त्यांना दिले जायचे, असा आरोप साळुंखे यांच्या निकटवर्तीयांनी केला आहे. दरम्यान, 80 टक्के भाजलेल्या वनमजूर साळुंखे यांना नाशिक येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. या घटनेनंतर वनपाल सागर पाटील यांच्यावर कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.
धुळ्यात आत्मदहनाच्या दोन घटना
धुळ्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत प्रजासत्ताक दिनी ध्वजवंदन सोहळा सुरू होता. यावेळी शिरपूर येथील गोरक्षक असलेल्या वावड्या पाटील नामक गोरक्षकाने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. शिरपूर शहरातून अवैधरित्या होणारी गोवंशाची वाहतूक पीआय के. के. पाटील हे थांबवत नसून आम्ही या गाड्या अडवण्यासाठी गेलो असता आमच्यावर गुन्हा दाखल करण्याची धमकी देत असल्याचा आरोप वावड्या पाटील यांनी केला आहे. के. के. पाटील यांच्यावर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी वावड्या पाटील यांनी अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच गोरक्षकाला ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. तर धुळ्यातील जैताणे ग्रामपंचायतीत सरपंच व ग्रामसेवकांनी आपला मनमानी कारभार चालवला आहे. दलित वस्तीत येणारा निधी हा आपल्या वार्डामध्ये वळवून सरपंच मनमानी कारभार करत असल्याचा आरोप करत जिल्हा परिषदेच्या आवारात एकाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. समाधान महाले असे आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्याचे नाव आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या