(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs SL, Day 2 Stumps:आधी जाडेजाची धमाकेदार फलंदाजी, मग फिरकीपटूंची कमाल गोलंदाजी, भारताकडे दिवसअखेर 466 धावांची आघाडी
IND vs SL 1st Test Score: पहिल्या कसोटी सामन्यात भारताने आधी 574 धावा करत दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस श्रीलंकेची स्थिती 108 धावांवर 4 बाद अशी केली आहे.
IND vs SL, Day 2 Stumps: भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यात मोहालीत येथे पहिला कसोटी सामना पार पडत आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशीपासून भारताचं पारडं जड दिसत आहे. पहिल्या दिवशी दिवसभर फलंदाजी केल्यानंतर दुसऱ्या दिवशीही भारताने बराच काळ फलंदाजी केली. ज्यानंतर अखेर 574 धावांवर डाव घोषीत केला. त्यानंतर गोलंदाजीमध्येही पटपट विकेट मिळवत दुसरा दिवस संपताना भारताकडे 466 धावांची आघाडी आहे. श्रीलंकेची हालत 108 धावांवर 4 बाद अशी आहे. यामध्ये रविंद्र जाडेजाने नाबाद 175 तर पंतने 96 धावा केल्या असून गोलंदाजीमध्ये आश्विनने 2 आणि जाडेजा, बुमराहने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली आहे.
सामन्याच्या पहिल्या दिवशी नाणेफेक जिंकत भारताने फलंदाजाची निर्णय घेतला. पहिल्या दिवशी भारतीय संघाने 85 षटकांत 6 बाद 357 धावा केल्या. पहिल्या दिवशी ऋषभ पंतने 97 चेंडूमध्ये 96 धावा केल्या. तर हनुमा विहारीने 128 चेंडूत 58 धावा केल्या. विराट कोहलीचा हा शंभरावा कसोटी सामना आहे. मात्र कोहली 45 धावा करुन तंबूत परतला होता. दुसऱ्या दिवशी जाडेजाने उत्तम सुरुवात केली त्याला आश्विनची साथ मिळाली. आश्विन 61 धावा करुन बाद झाला तर जाडेजा 175 धावांवर नाबाद राहिला. अखेर 574 धावांवर भारताने डाव घोषित केला. ज्यानंतर श्रीलंकेचे फलंदाज क्रिजवर आहे. पण सुरुवातीपासून भारतीय गोलंदाजांनी कसून गोलंदाजी केली. आश्विनने 2 आणि जाडेजा, बुमराहने प्रत्येकी 1-1 विकेट घेत दिवस अखेर श्रीलंकेची अवस्था 108 वर 4 बाद अशी केली असून सध्या पाथुम निसांका (26) आणि चरित असलांका (1) क्रिजवर आहेत.
जाडेजाने मोडला कपिल देव यांचा विक्रम
या सामन्यात रवींद्र जाडेजाच्या नावावर एक नवा विक्रम झाला आहे. त्याने जाडेजाने भारताचे माजी खेळाडू कपिल देव यांचा विक्रम मोडला आहे. रवींद्र जाडेजा हा सातव्या क्रमांकावर खेळायला आला होता. यापूर्वी सातव्या क्रमांकावर खेळायला येऊन सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम हा कपिल देव यांच्या नावावर होता. कपिल देव यांनी सातव्या क्रमांकावर खेळायला येऊन 170 धावांची खेळी केली होती. पण जाडेजाने 175 धावंची दमदार खेळी करत कपिल देव यांचा विक्रम मोडला आहे.
ऋषभचा नवा रेकॉर्ड
मोहालीमध्ये रिषभ पंतने 97 चेंडूंचा सामना करत 96 धावा केल्या. या दरम्यान त्याने 9 चौकार आणि चार षटकार लगावले. या षटकारांच्या मदतीने एक खास रेकॉर्ड बनवण्यात पंत यशस्वी ठरला. क्रिकेटमध्ये ऑगस्ट 2018 पासून सर्वाधिक षटकार ठोकण्याच्या बाबतीत रिषभ पंत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. याबाबतीत त्याने रोहित शर्मालाही मागे टाकलं. कसोटी क्रिकेटमध्ये ऑगस्ट 2018 नंतर आतापर्यंत सर्वाधिक षटकार लगावणाऱ्यांच्या यादीत बेन स्टोक्स पहिल्या स्थानावर आहे. इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्सने 43 षटकार लगावले आहेत.
हे ही वाचा -