(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Virat Kohli Test Runs : शंभराव्या कसोटीत 8000 धावा पूर्ण करणारा विराट कोहली दुसरा फलंदाज
विराट कोहलीने आपल्या 100व्या कसोटीच्या 169व्या डावात 8000 धावा पूर्ण केल्या. याशिवाय 100 व्या कसोटीत आठ हजार धावांना गवसणी घालणारा विराट हा ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉण्टिंगनंतरचा दुसराच खेळाडू आहे.
मोहाली : कसोटी कारकीर्दीतील शंभरावा सामना खेळणाऱ्या विराट कोहलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये आठ हजार धावा केल्या आहेत. श्रीलंकेविरुद्ध मोहालीमध्ये कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरु आहे. कोहलीने सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या उपाहारानंतर विश्वा फर्नांडोच्या चेंडूवर आठ हजारावी धाव पूर्ण केली. कसोटी क्रिकेटमध्ये आठ हजार धावा पूर्ण करणारा विराट कोहली हा भारताचा सहावा खेळाडू आहे. कोहलीने आपल्या 100व्या कसोटीच्या 169व्या डावात 8000 धावा पूर्ण केल्या. याशिवाय 100 व्या कसोटीत आठ हजार धावांना गवसणी घालणारा विराट हा ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉण्टिंगनंतरचा दुसराच खेळाडू आहे.
दरम्यान शंभरावी कसोटी खेळणाऱ्या विराटला फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. केवळ 45 धावा करुन तो बाद झाला. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या 8007 धावा झाल्या आहेत.
.@imVkohli breaches another milestone on his momentous day.
— BCCI (@BCCI) March 4, 2022
8000 and counting runs in whites for him 👏👏#VK100 @Paytm #INDvSL pic.twitter.com/EDZz9kPZwy
भारतासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सचिन तेंडुलकर प्रथम स्थानावर आहे. सचिन तेंडुलकर (15921), राहुल द्रविड (13265), सुनील गावस्कर (10122), व्हीव्हीएस लक्ष्मण (8781) आणि वीरेंद्र सेहवाग (8503) हे भारतासाठी सर्वाधिक धावा करणारे फलंदाज आहेत.
Virat Kohli 100th Test: राहुल द्रविडकडून 100व्या कसोटीची कॅप, भावूक विराटकडून जुन्या किश्श्याची आठवण
सर्वात कमी डावांमध्ये 8 हजार धावा बनवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहली पाचव्या क्रमांकावर आहे. सचिन तेंडुलकरने सर्वात कमी 154 डावांमध्ये 8 हजार धावा पूर्ण केल्या होत्या. टीम इंडियाचे विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविडला या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी 157 डाव खेळावे लागले होते. केवळ व्हीव्हीएस लक्ष्मणने विराट कोहलीपेक्षा जास्त डावांवमध्ये 8 हजार धावा पूर्ण केल्या होत्या. त्याला 201 डाव खेळावे लागले.
सर्वात कमी 152 डावांमध्ये 8 हजार धावा करण्याचा जागतिक विक्रम श्रीलंकेचा कुमार संगकाराच्या नावावर जमा आहे. आतापर्यंत 32 खेळाडूंनी कसोटी क्रिकेटमध्ये आठ हजार धावा पूर्ण केल्या आहेत.
154 - सचिन तेंडुलकर
157 - राहुल द्रविड
160 - वीरेंद्र सेहवाग
166 - सुनील गावस्कर
169 - विराट कोहली
201 - व्हीव्हीएस लक्ष्मण
रिकी पॉण्टिंगने 2006 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सिडनी कसोटीत 8000 धावा पूर्ण केल्या होत्या. तर विराट कोहलीने 2022 मध्ये मोहालीमध्ये त्याच्या 8000 धावा पूर्ण केल्या.