ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार ग्रेग चॅपल यांचं शेन वॉर्न यांच्याबद्दल मोठं वक्तव्य, म्हणाले...
शेन वॉर्न हे आधी जादूगार होते आणि नंतर ते उत्कृष्ट लेगस्पिन गोलंदाज होते, अशा भावना ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार ग्रेग चॅपेल यांनी व्यक्त केल्या आहेत.
Shane Warne : ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटर शेन वॉर्न (Shane Warne) यांचे शुक्रवारी निधन झाले आहे. जगभरातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार ग्रेग चॅपेल यांनीही सोमवारी शेन वॉर्नला श्रद्धांजली वाहिली आहे. यावेळी चॅपेल यांनी म्हटलं आहे की, " शेन वॉर्न आधी जादूगार आणि नंतर फिरकीपटू होते, आपल्या कौशल्याच्या जोरावर त्यांनी जगाला मोहित केले."
ग्रेग चॅपेल यांनी 'सिडनी मॉर्निंग हेराल्ड'मध्ये शेन वॉर्नबद्दल लिहिले आहे. "मी शेन वॉर्नचा विचार करतो, त्यावेळी मला अमेरिकन निसर्गवादी कवी आणि लेखक हेन्री डेव्हिड थोरो यांचे शब्द आठवतात. शेन वॉर्न हे आधी जादूगार होते आणि नंतर ते उत्कृष्ट लेगस्पिन गोलंदाज होते.
"क्रिकेटनंतरही शेन वॉर्नसोबत व्हिक्टोरियातील कॅथेड्रल लॉज आणि गोल्फ क्लबमध्ये अनेक गोल्फ सामने खेळता आले. तुम्ही गोल्फ कोर्सवर त्यांच्यासोबत चार तास घालवता तेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला चांगल्या प्रकारे ओळखता. हे भाग्य मला मिळालं आहे, की मी त्याला ओळखले आहे. शेन वॉर्न हा एक महान लेग स्पिनरपेक्षा खूप काही अधिक होता. कारण त्याने क्रिकेटपटूंच्या पिढीला ही कला स्वीकारण्यास प्रेरित केले."असे चॅपेल यांनी लिहिले आहे.
13 सप्टेंबर 1969 रोजी जन्मलेल्या शेन वॉर्न यांनी 1992 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर अनेक वर्षे त्यांनी क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटवर राज्य केले. वॉर्न यांची गुगली समजून घेण्यात मोठे फलंदाज अपयशी ठरले आहेत. त्यांची गणना जगातील महान फिरकीपटूंमध्ये केली जाते.
शेन वॉर्न यांनी ऑस्ट्रेलियाकडून 145 कसोटी आणि 194 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यांच्या नावावर कसोटीत 708 विकेट्स आहेत. यासोबतच वॉर्न यांनी वनडेमध्ये 293 विकेट्स घेतल्या आहेत. वॉर्न यांनी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 2007 मध्ये खेळला होता.
महत्वाच्या बातम्या