एक्स्प्लोर
कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत अश्विन अव्वल
नवी दिल्लीः इंदूर कसोटीत भारताच्या विजयाचा प्रमुख शिल्पकार ठरलेल्या रवीचंद्रन अश्विनने आयसीसी कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत पुन्हा अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. या कसोटीआधी आयसीसी क्रमवारीत अश्विन तिसऱ्या क्रमांकावर होता.
न्यूझीलंडविरुद्धच्या इंदूर कसोटीत अश्विनने तेरा फलंदाजांना माघारी धाडून भारताच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. या कामगिरीने त्याच्या खात्यात 900 रेटिंग गुणांची नोंद झाली आहे. तसंच त्याने इंग्लंडचा जेम्स अँडरसन आणि दक्षिण आफ्रिकेचा डेल स्टेन यांना पिछाडीवर टाकून आयसीसी क्रमवारीत पुन्हा अव्वल स्थान काबीज केलं.
कसोटी गोलंदाजांच्या या क्रमवारीत अव्वल स्थान मिळवण्याची अश्विनची ही तिसरी वेळ आहे. दरम्यान, न्यूझीलंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत अश्विननेच 27 विकेट्स घेऊन भारताला 3-0 असं निर्भेळ यश मिळवून दिलं. अश्विनच्या खात्यात आता 39 कसोटी सामन्यांमध्ये 220 विकेट्स झाल्या आहेत. आजवरच्या इतिहासात 39 कसोटी सामन्यांमध्ये ही सर्वोत्तम कामगिरी आहे.
अजिंक्य रहाणे सहाव्या स्थानी
टीम इंडियाचा फलंदाज अजिंक्य रहाणेने आयसीसी कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत सहावं स्थान काबीज केलं आहे. अजिंक्यने आजवरच्या कारकीर्दीत कसोटी क्रमवारीत मिळवलेलं हे सर्वोत्तम स्थान आहे.
इंदूर कसोटीआधी अजिंक्य आयसीसी क्रमवारीत अकराव्या स्थानावर होता. पण इंदूर कसोटीतल्या 188 आणि नाबाद 23 धावांच्या खेळींनी अजिंक्यला क्रमवारीत सहावं स्थान मिळवून दिलं. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत सातत्यपूर्ण फलंदाजी करणारा चेतेश्वर पुजाराही एक पाऊल पुढे सरकला आहे. आयसीसी क्रमवारीत तो पंधराव्या स्थानावरून चौदाव्या स्थानावर दाखल झाला आहे.
चेतेश्वर पुजाराने इंदूर कसोटीत 41 आणि नाबाद 101 धावांच्या खेळी केल्या होत्या. या कसोटीच्या पहिल्या डावात द्विशतक झळकावणारा भारताचा कर्णधार विराट कोहली कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत विसाव्या स्थानावरून सोळाव्या स्थानावर दाखल झाला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement