अंबाती रायुडूची प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती
वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत रायुडूनं एक शतक आणि एक अर्धशतकीय खेळी केली होती. या मालिकेत रायुडूनं एकूण 217 धावा कुटल्या होत्या.
मुंबई : भारताचा मधल्या फळीतला फलंदाज अंबाती रायुडूनं प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. वन डे आणि ट्वेन्टी ट्वेन्टीसारख्या क्रिकेटच्या छोट्य़ा फॉरमॅटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी रायुडूनं हा निर्णय घेतला. हैदराबाद क्रिकेट असोसिएशनला लिहिलेल्या पत्रात रायुडूनं ही माहिती दिली.
रायुडूनं या पत्रात इतकी वर्ष खेळायला दिल्याबद्दल बीसीसीआय, हैदराबाद, बडोदा आणि विदर्भ क्रिकेट असोसिएशचे आभार मानले आहेत. रायुडूनं भारताच्या वन डे संघात आपलं स्थान पक्कं केलं आहे. त्यामुळे भारतीय संघातली चौथ्या क्रमांकाची जागा आणखी मजबूत करण्यासाठी रायुडूनं प्रथम श्रेणी क्रिकेटला गुडबाय करण्याचा निर्णय घेतला.
रायुडूनं आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्सकडून केलेल्या दमदार प्रदर्शनामुळे त्याला भारतीय संघात स्थान मिळालं. इंग्लंडमध्ये पार पडणाऱ्या वर्ल्डकपमध्ये भारताकडून चौथ्या नंबरवर फलंदाजी करणारा खेळाडू म्हणून रायुडूकडे पाहिलं जात आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत रायुडूनं एक शतक आणि एक अर्धशतकीय खेळी केली होती. या मालिकेत रायुडूनं एकूण 217 धावा कुटल्या होत्या.
रायुडूने 'लिस्ट ए' क्रिकेटमध्ये एकूण 150 सामने खेळला असून त्यात त्याने 4856 धावा केल्या आहेत. यामध्ये 5 शतकं आणि 36 अर्धशतकांचा समावेश आहे. तर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये रायुडूने 156 डावांत 16 शतकं आणि 34 अर्धशतकांसह एकूण 6151 धावा केल्या आहेत. तर आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात रायुडूच्या 1447 धावा आहेत.