Ramdas Athawale on Caste wise census : संघाचा विरोध असला तरी, जातीनिहाय जनगणना झालीचं पाहिजे; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी स्पष्ट केली भूमिका
Yavatmal News : आरक्षणाचा वाद मिटवायचा असेल तर ज्या जातीची जेवढी टक्केवारी, तेवढे आरक्षण त्या त्या जातीला द्यावे. तसेच जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली.
Ramdas Athawale on Caste Wise Census : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (RSS) जातीनिहाय जनगणनेला विरोध असला तरी जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. अशी आरपीआयची (RPI) भूमिका असल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Union Minister Ramdas Athawale) यांनी स्पष्ट केले. आरक्षणाचा वाद मिटवायचा असेल तर ज्या जातीची जेवढी टक्केवारी आहे, तेवढे आरक्षण त्या त्या जातीला द्यावे, अशी मागणीही आठवलेंनी यवतमाळमध्ये केली. मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) आपला विरोध नसून मराठा समाजातील गोरगरिबांना ज्यांचे उत्पन्न 8 लाखांच्या आत आहे. त्यांना आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे. अशी आमची भूमिका असल्याचे आठवले म्हणाले.
जातीची जेवढी टक्केवारी, तेवढे आरक्षण - रामदास आठवले
कोणत्या जातीमध्ये किती टक्के लोकसंख्या आहे, हे कळणे गरजेचे आहे. मराठा समाजाचे म्हणने आहे की ते 35 टक्के आहेत. त्याप्रमाणे इतर समाजांच्या लोकांना विचारले तर ते वेगवेगळी आकडे देतात. अशी जर मोघम आकडेवारी घेतली तर ती कितीतरी कोटीच्या घरात जाते. तर नक्की कोणत्या जातीचे किती टक्के आहे हे कळण्यासाठी जातीनिहाय जनगणना करणे गरजेचे आहे. या आरक्षणाचा वाद मिटवायचा असेल तर ज्या जातीची जेवढी टक्केवारी आहे, तेवढे आरक्षण त्या त्या जातीला द्यावे. अशी आमची नवी मागणी आहे. असा जर निर्णय समजा झाला तर लोकसंख्येच्या आधारे आमची टक्केवारी 15 टक्के होती. त्याआधारे आम्हाला 15 टक्के आरक्षण मिळतंय. महाराष्ट्रात आमची 13 टक्के लोकसंख्या असल्याने 13 टक्के आरक्षण आम्हाला मिळत आहे. त्याच धर्तीवर इतर समाजाला मिळत असेल तर आम्हाला आनंद आहे. अशी भूमिका केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केली.
सर्वात आधी मराठा आरक्षणाची मागणी आमची - रामदास आठवले
ओबीसी समाजाची नक्की आकडेवारी किती आहे हे जनगणना झाल्या शिवाय कळणार नाही. काका कालेलकर आयोगाने जो अभ्यास केला आहे, त्यानुसार अंदाजे 52 टक्के ओबीसी देशात असल्याचा त्यांचा अभ्यास आहे. महाराष्ट्रात सर्वात आधी मराठा आरक्षणाची मागणी मी केली होती. आमच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजातील गोर गरिबांना आरक्षण मिळाले पाहिजे. खेड्यापाड्यांत आजही सर्वच मराठे श्रीमंत नाही, सर्वच मराठे जमीनदार नाही. सर्वच मराठे आमदार-खासदार , उद्योगपती आहे असे नाही. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही आमची आग्रही भूमिका आहे. तसेच मनोज जरांगे पाटलांची जी मागणी आहे, ती योग्यच असल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणले.
संसदेवरील हल्ला ही मोठी चूक
संसदेवरील हल्ला ही सुरक्षा व्यवस्थेची मोठी चूक आहे. सुरक्षा व्यवस्था चोख असणे फार गरजेचे होते. 13 डिसेंबरला त्याच दिवशी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. नेमके त्याच दिवशी हा प्रकार घडणे हे गंभीर आहे. आंदोलन करतांना हा दिवस निवडणे चुकूचे होते. यामध्ये लातूरचा देखील तरुण असून त्यांची चौकशी सुरू आहे. नव्या संसद भवनातील गॅलरीची उंची कमी असल्याने त्यावरून तरुणांनी उड्या मारल्या. हा निंदनीय प्रकार असून या मुद्द्यावर संसदेत चर्चा व्हायला हवी मात्र विरोधक ती होऊ देत नाही. असा आरोप केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला.
बाबासाहेबांच्या विचारांचा अजेंडा , हाती निळा झेंडा
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा रिपाई ऐक्याची भाषा केली आहे. मी आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आलो तर आमची ताकद मोठी होईल आणि आम्ही वंचित समाजघटकांना न्याय देऊ. प्रकाश आंबेडकर यांनी बाबासाहेबांनी स्थापन केलेला रिपाई पक्ष चालविला तर त्याला यश मिळेल. मी ज्यांना पाठिंबा देतो त्यांना सत्ता मिळते म्हणून प्रकाश आंबेडकरांनी इंडिया आघाडीत जाण्याऐवजी भाजपसोबत एनडीए मध्ये यायला हरकत नाही. असे आवाहन आठवले यांनी केले. माझ्या पक्षाचा अजेंडा हा बाबासाहेबांच्या विचारांचा अजेंडा आहे, माझ्या हाती निळा झेंडा आहे. असे देखील ते म्हणाले. जिथे समाजाचा प्रश्न आहे, तिथे मी समाजाला न्याय देतो. त्यामुळे माझा पक्ष देखील वाढला आहे. मी ज्याना साथ देतो त्या पक्षाला सत्ता मिळते आणि प्रकास आंबेडकर ज्यांना साथ देतात त्यांना सत्ता मिळत नाहीये. ते आणि मी एकत्र आलो तर मोठी ताकद निर्माण करू शकतो. आम्हाला नक्कीच मोठे यश येईल असा विश्वास देखील रामदास आठवले यांनी बोलतांना व्यक्त केला.