US attacks on Iran: अमेरिकेने इराणवर 'मदर ऑफ ऑल बॉम्ब' का टाकला? इराणने जमिनीखाली नेमकं काय लपवलंय?
America use MOAB bomb for Iran attack: युद्ध तुम्ही सुरु केलंय, शेवट आम्ही करु. आता अमेरिकेचं अभूतपूर्व आणि आजपर्यंत कधीही पाहिलं नाही, असं नुकसान होईल, असा इशारा इराणने अमेरिकेला दिला आहे.

US attacks on Iran: गेल्या काही दिवसांपासून इराण आणि इस्रायल यांच्यात सुरु असलेल्या युद्धात आता अमेरिकेने उडी घेतली आहे. अमेरिकन लष्कराच्या विमानांनी शनिवारी रात्री हवाई हल्ला करुन इराणमधील फोर्डो,नातांझ आणि एसफहान हे तीन आण्विक तळ (Nuclear sites) उद्ध्वस्त केले. हे तळ उद्ध्वस्त करण्यासाठी अमेरिकेने रडारच्या कचाट्यात न सापडणाऱ्या अत्याधुनिक अशा B-2 स्टील्थ बॉम्बर विमानांचा वापर केला. या विमानांमधून इराणच्या आण्विक तळांवर मासिव्ह ऑर्डिनेस एअर ब्लास्ट श्रेणीत मोडणारे GBU-57A/B बाँब (MOAB bomb) टाकण्यात आले. अगदी जमिनीच्या आत खोलवर नुकसान करण्याची क्षमता असलेली ही स्फोटकं 'मदर ऑफ ऑल बॉम्ब' म्हणून ओळखली जातात. अलीकडच्या काळात अशाप्रकारच्या संहारक शस्त्रांचा वापर क्वचितच केला जातो. त्यामुळे अमेरिकेने इराणच्या आण्विक तळांवर हे संहारक बॉम्ब का टाकले, याची चर्चा सध्या सुरु झाली आहे.
अमेरिकेने युद्धात उडी घेऊन इराणच्या भूमीवर 'मदर ऑफ ऑल बॉम्ब' टाकण्याचे मुख्य कारण म्हणजे इराणकडून सुरु असलेली अणुबॉम्बची चाचणी. इराण अणुबॉम्ब बनवण्याच्या अत्यंत जवळ येऊन पोहोचला होता. त्यामुळे आठ दिवसांपूर्वीच इस्रायलने इराणच्या आण्विक तळावर हल्ला करुन तेथील महत्त्वाचे लष्करी अधिकारी आणि अणुशास्त्रज्ञांना ठार मारले होते. मात्र, त्यानंतरही इराणने अणुबॉम्ब तयार करण्याचे प्रयत्न सोडले नव्हते. इराणकडून दोन आण्विक तळांवर युरेनियमचा वापर करुन प्रयोग सुरु होते, असे सांगितले जाते. इराणने आपली क्षेपणास्त्रं, शस्त्रसाठा आणि आण्विक तळ हे जमिनीखाली खोलवर तयार केले आहेत. काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर इराणच्या भूमिगत क्षेपणास्त्र भंडाराचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. इस्रायलला या भूमिगत तळांना लक्ष्य करता येत नव्हते. त्यांच्याकडे तेवढी संहारक शस्त्रं नव्हती. त्यामुळे अमेरिकेने या युद्धात उडी घेत इराणवर 'मदर ऑफ ऑल बॉम्ब' टाकल्याचे सांगितले जात आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सध्या सुट्टीवर होते. मात्र, ते शनिवारी घाईघाईने वॉशिंग्टनला परतले होते. त्यानंतर अमेरिकन लष्कराच्या विमानांनी इराणवर हवाई हल्ला केला. डोनाल्ड ट्रम्प वॉर रुममध्ये बसून या सगळ्याचे लाईव्ह प्रक्षेपण पाहत होते. अमेरिकेच्या या हल्ल्यामुळे मध्यपूर्वेतील परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
आणखी वाचा
तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात झालीय का? अमेरिकेच्या इराणवरील घातक बॉम्ब हल्ल्यानंतर चर्चांना उधाण
























