Ukraine drone attack on Russia: युक्रेनच्या ऑपरेशन वेबमध्ये रशियाच्या अतिमहागड्या विमानांचा कोळसा, एका विमानाची किंमत 3000 कोटी
Ukraine attack on Russia: युक्रेनच्या हल्ल्यात रशियाची 41 लढाऊ विमानं नष्ट. या हल्ल्यात युक्रेनच्या गुप्तहेर खात्याने महत्त्वाची भूमिका बजावली. 4000 किलोमीटर आतमध्ये घुसून हल्ला

Ukraine massive drone attack on Russia: गेल्या काही महिन्यांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु असलेल्या युद्धात रविवारी एक निर्णायक घटना घडली. युक्रेनकडून रविवारी रशियन सैन्याच्या प्रमुख हवाई तळांवर ड्रोन हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात रशियाचे प्रचंड नुकसान झाले आहे. युक्रेनच्या आत्मघाती ड्रोन्सनी रशियाच्या वायूदलाची तब्बल 41 लढाऊ विमानं नष्ट केली आहेत. या हल्ल्यात रशियाची अणवस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेली सर्व विमाने नष्ट झाल्याचा दावा यु्क्रेनकडून केला जात आहे.
या ड्रोन हल्ल्यात रशियाची टीयू-95, टीयू-22 सारखी बॉम्बर्स विमानं आणि ए-50 ही महागडी हेर विमाने नष्ट झाली. रशियाकडे फक्त दहा ए-50 विमानं होती. हे एक विमान 3000 कोटींचे आहेत. मात्र, युक्रेनच्या हल्ल्यात यापैकी काही विमाने नष्ट झाली आहेत. या प्रचंड हानीमुळे रशियन वायूदलाचे कंबरडे मोडल्याचे सांगितले जात आहे.
युक्रेनने ड्रोन हल्ल्याच्या मोहीमेला 'ऑपरेशन वेब' असे नाव दिले होते. या हल्ल्यासाठी युक्रेनने फर्स्ट पर्सन व्ह्यू ड्रोनचा वापर केला. युक्रेन गेल्या दीड वर्षांपासून या हल्ल्याची योजना आखत होता. त्यासाठी सीमारेषेपासून तब्बल चार हजार किलोमीटर आतमध्ये 40 ट्रकमधून 117 ड्रोन्स छताच्या लाकडी भागात लपवून रशियन सैन्याच्या हवाई तळापर्यंत नेण्यात आले. हा ट्रक रशियाच्या हवाई तळापर्यंत पोहोचल्यानंतर ट्रकचे केबिन्स रिमोटने उघडण्यात आले. यामधून बाहेर पडलेल्या ड्रोन विमानांनी रशियाच्या इर्कुत्सक, इव्हानोव्हा, रायझान, आमूर आणि मर्मान्स्क या पाच प्रांतांमध्ये हवाई हल्ले केले. युक्रेनच्या ड्रोन्सकडून रशियन हवाई तळावरील बॉम्बर्स विमानांना लक्ष्य करण्यात आले.
रशियाने अणवस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेली बॉम्बर्स विमानं युक्रेनच्या क्षेपणास्त्रांच्या टप्प्यात येणार नाही, याची काळजी घेतली होती. यासाठी ही विमाने रशियाच्या आतल्या भागात ठेवण्यात आली होती. मात्र, युक्रेनच्या ड्रोन्सनी या बॉम्बर्स विमानांना अचूकपणे लक्ष्य केले. त्यामुळे रशियाचे अब्जावधी डॉलर्सचे नुकसान झाले आहे. ही लढाऊ विमाने पु्न्हा तयार करण्यासाठी आणि कार्यरत होण्यासाठी बराच अवधी जावा लागेल. त्यामुळे युक्रेनचा हा ड्रोन हल्ला रशियासाठी मोठा झटका मानला जात आहे.
आणखी वाचा























