तालिबान-इराणच्या सैनिकांमध्ये गोळीबार; 9 जण ठार, 3 चेक पोस्टवर तालिबानींचा ताबा
Taliban-Iran clash: तालिबान आणि इराणच्या सैनिकांमध्ये भीषण गोळीबार झाला. या गोळीबारात इराणचे 9 सैनिक ठार झालेत.
Taliban-Iran clash: अफगाणिस्तानमधील निमरोझ प्रांताजवळ तालिबान आणि इराण यांच्यात भीषण संघर्ष सुरू झाला. या रक्तरंजित संघर्षात किमान नऊ जणांचा मृत्यू झाल्याचा तालिबान प्रशासनाचा दावा आहे. अफगाणिस्तान-इराण सीमेवर इराणकडून इंधनाची तस्करी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे तालिबानी अधिकाऱ्याने सांगितले. यानंतर तालिबान आणि इराणी सैन्यात चकमक सुरू झाली. बुधवारी दिवसभर सुरू झालेली ही चकमक सायंकाळपर्यंत सुरू होती.
तालिबानच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी आणि प्रत्यक्षदर्शींनी दावा केला की, तालिबानने तीन चेकपोस्ट ताब्यात घेतल्या आहेत. तालिबानचे प्रवक्ते जबिउल्लाह मुजाहिद याने एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्याने म्हटले की, स्थानिक पातळीवर गैरसमजातून ही चकमक झाली आहे. दोन्ही बाजूंनी झालेल्या परस्पर चर्चेनंतर आता परिस्थिती नियंत्रणात आहे. 'अरब न्यूज'च्या वृत्तानुसार, निमरोझ प्रांताच्या राज्यपालाने इंधन तस्करीमुळे निर्माण झालेला गैरसमज दूर झाला असल्याचे म्हटले.
परिस्थिती नियंत्रणात पण तालिबान सतर्क
निमरोजच्या राज्यपालाने म्हटले की, अफगाणिस्तानमध्ये सुरू असलेल्या इंधन तस्करीमुळे गैरसमज निर्माण झाला होता. या लढाईत किमान 9 इराणी सैनिक ठार झाले आहेत. तर, अनेकजण जखमी झाले आहेत. एक तालिबानी जखमी झाल्याचे त्यांनी म्हटले. परिस्थिती नियंत्रणात असून आम्ही सतर्क असल्याचे त्याने सांगितले.
तालिबानसोबतच्या संघर्षात इराणी सैनिक ठार झाल्याच्या दाव्याला इराणच्या अधिकाऱ्यांनी अद्याप दुजोरा दिला नाही. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, तालिबानींनी इराणच्या सीमेत घुसखोरी केली. तालिबानने बुर्जक, मेलक आणि शाह बालक या पोस्टवर ताबा मिळवला होता. या दरम्यान दोन्ही बाजूंनी भीषण गोळीबार झाला.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- India Pakistan : भारताचा अफगाणिस्तानला मदतीचा हात, वाघा बॉर्डरमार्गे मदत पोहोचवण्यास पाकिस्तानची आडकाठी
- पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नाचक्की! 'मुलांना शाळेतून काढलंय, पगार द्या'; सर्बियातील पाकिस्तानी दूतावासाचं ट्वीट
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha