(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pakistan Flood : पाकिस्तानात पुराचं थैमान, 50 लाख कोटी रुपयांचं कर्ज, मोठा आर्थिक फटका
पाकिस्तानात पुरानं (Pakistan Flood) थैमान घातलं आहे. पुराचा मोठा फटका तेथील नागरिकांना बसला आहे. तसेच देशाचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे.
Pakistan Flood : पाकिस्तानात पुरानं (Pakistan Flood) थैमान घातलं आहे. यामुळं तेथील जनजीवन विस्कळीत झालं आहे. तीन कोटीहून अधिक नागरिकांना या पुराचा फटका बसला असून, आत्तापर्यंत 1 हजार 265 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात पुरामुळं 57 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान,पाकिस्तानवर सुमारे 50 लाख कोटी रुपयांचे कर्ज झाले आहे. आर्थिक स्थिती देखील नाजूक झाली आहे. तसेच पुरामुळं अन्नधान्याच्या टंचाईबरोबरच आरोग्याचं संकट देखील निर्माण झालं आहे.
पाकिस्तानने या आपत्तीची तुलना 2005 मध्ये अमेरिकेत आलेल्या 'कॅटरीना' वादळाशी केली आहे. ज्यामुळं तिथे प्रचंड विध्वंस झाला होता. पाकिस्तान सरकारने आता आंतरराष्ट्रीय समुदायाला तातडीने मदत करण्याचे आवाहन केलं आहे. निसर्गाच्या कोपाचा सामना करणार्या पाकिस्तानबाबत अशी भीती व्यक्त केली जात आहे की, तिथे केव्हाही जनतेचा रोष उसळू शकतो. जनता रस्त्यावर येऊन सरकारच्या विरोधात आक्रमक होण्याची शक्यता आहे. महागाई, उपासमार, लोकांचे विस्थापन आणि साथीचे रोग पसरण्याची भीती आहे. यामुळं देश मोठ्या संकटात सापडला आहे.
संकटातही राजकारण सुरुच
खरं तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसारख्या संस्थांनी पाकिस्तानमध्ये गृहयुद्धासारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. पूरासंबंधित समस्या हे यामागचे कारण आहे. शिवाय पाकिस्तानचे राजकारणही एक कारण आहे. पाकिस्तानातील तहरीक-ए-इन्साफ पक्ष आणि त्यांचे प्रमुख इम्रान खान हे आधीच पीएमएल-एनच्या नेतृत्वाखालील शेहबाज शरीफ सरकारच्या विरोधात संतापले आहेत. अशा परिस्थितीतही ते सरकारला घेरण्याची एकही संधी सोडत नाहीत. उलट इस्लामाबादपर्यंत मोर्चा काढण्याचा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे. सरकार आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना जाणूनबुजून त्रास देत असल्याचा आरोप इम्रान यांनी खान यांनी केला असून, त्याविरोधात ते रॅली काढणार आहेत.
महागाईत मोठी वाढ
पाकिस्तानमध्ये सध्या महागाईत मोठी वाढ झाली आहे. लोकांच्या म्हणण्यानुसार वांग्याला दीडशे रुपये किलो, कांदा अडीचशे रुपये किलो आणि टोमॅटो शंभर रुपये किलोपर्यंत मिळत आहेत, तर कुठे 300 रुपये किलोने विकली जात आहेत. प्रत्येक वस्तूचे भाव वाढले आहेत. काही दुकानदारही आपत्तीचा फायदा घेत महागड्या किंमतीत वस्तू विकत असल्याचा आरोपही केला जात आहे.
35 लाख एकर क्षेत्रावरी पिकं नष्ट
पाकिस्तानमध्ये आलेल्या पुरामुळे आतापर्यंत 1 हजार 265 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये 400 मुलांचा समावेश आहे. त्याचवेळी 3.3 कोटी लोकांना पुराचा फटका बसला आहे. पुरामुळं 11 लाखांहून अधिक घरांचे नुकसान झाले आहे. 18 हजार शाळांमध्ये पूर आला आहे. त्याचवेळी पाकिस्तानमध्ये आलेल्या पुरामुळं 160 हून अधिक पूल तुटले आहेत. 5 हजार किलोमीटरचे रस्ते उद्ध्वस्त झाले आहेत. 35 लाख एकर पिके नष्ट झाली आहेत, तर 8 लाखांहून अधिक गुरांना जीव गमवावा लागला आहे. एवढेच नाही तर आता पाकिस्तानातील लोकही गंभीर आजारांनी ग्रस्त झाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: