Pakistan Flood : पाकिस्तानात पुराचा हाहाकार, एक तृतीयांश भाग पाण्यात, तीन कोटीहून अधिक नागरिकांना फटका
पाकिस्तानमध्ये (Pakistan) पुरानं थैमान घातलं आहे. मुसळधार पाऊस आणि पुरामुळं (Flood) तेथील जनजीवन विस्कळीत झालं आहे.
Pakistan Flood : पाकिस्तानमध्ये (Pakistan) पुरानं थैमान घातलं आहे. मुसळधार पाऊस आणि पुरामुळं (Flood) तेथील जनजीवन विस्कळीत झालं आहे. दिवसेंदिवस तेथील परिस्थिती अधिकच बिकट होत चालली आहे. एका अहवालानुसार पाकिस्तानचा एक तृतीयांश (1/3) भाग पाण्यात बुडाला आहे. तर या पुरामुळं शेकडो लोकांच्या मृत्यू झाला असून, लाखो लोक बेघर झाले आहेत. या पुराच्या पाण्यामुळे शेती पिकांचंही मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं अन्नधान्याचा पुरवठाही दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे.
नेहमीपेक्षा यंदा 10 पट मान्सून अधिक
पुरामुळं पाकिस्तानमध्ये जनजीवन विस्कळीत झालं आहे. लाखो लोक संकटात सापडले आहेत. देशातील बहुतांश भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. यंदा मान्सूनचा पाऊस नेहमीपेक्षा 10 पट जास्त झाल्याचे सांगण्यात येत आहे. पुरामुळं अन्नधान्याच्या टंचाईबरोबरच आरोग्याचेही संकट निर्माण झालं आहे. पाकिस्तानमधील 27 दशलक्ष लोकांकडे पुरापूर्वी पुरेसे अन्न नव्हते, तर आता पुरानंतर हा धोका अधिकच वाढला आहे.
लोक अन्न संकटाचा सामना करत आहेत : पंतप्रधान शाहबाज शरीफ
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी 30 ऑगस्ट रोजी एका निवेदनात म्हटले आहे की देशातील लोक अन्न संकटाचा सामना करत आहेत. त्याचवेळी टोमॅटो, कांदा या भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. लोकांना अन्न पुरवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यांनी उपाशी झोपू नये हा आमचा हेतू असल्याची माहिती पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी दिली आहे.
35 लाख एकरवरी पिकं नष्ट
पाकिस्तानमध्ये आलेल्या पुरामुळे आतापर्यंत 1 हजार 200 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये 400 मुलांचा समावेश आहे. त्याचवेळी 3.3 कोटी लोकांना पुराचा फटका बसला आहे. पुरामुळं 11 लाखांहून अधिक घरांचे नुकसान झाले आहे. 18 हजार शाळांमध्ये पूर आला आहे. त्याचवेळी पाकिस्तानमध्ये आलेल्या पुरामुळं 160 हून अधिक पूल तुटले आहेत. 5 हजार किलोमीटरचे रस्ते उद्ध्वस्त झाले आहेत. 35 लाख एकर पिके नष्ट झाली आहेत, तर 8 लाखांहून अधिक गुरांना जीव गमवावा लागला आहे. एवढेच नाही तर आता पाकिस्तानातील लोकही गंभीर आजारांनी ग्रस्त झाले आहेत. पुरामुळं अतिसार, कॉलरा, डेंग्यू, मलेरिया यासारखे आजार झपाट्याने पसरत आहेत. पाकिस्तानात आलेल्या पुरामुळं खूप मोठं नुकसान झालं आहे. पुरामुळं सर्वत्र फक्त पाणीच पाणी दिसत आहे. दरम्यान, पूरग्रस्त भागात हेलिकॉप्टरच्या माध्यमातून लोकांना वाचवण्यात येत आहे. पाकिस्तानच्या इतिहासातील सर्वात भीषण हा पूर आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- Heavy Rain : यूपी बिहारसह उत्तराखंडमध्ये पूरस्थिती, तर पाकिस्तानात पुराचं थैमान, तर 1 हजार 200 जणांचा मृत्यू
- Pakistan Inflation : पाकिस्तानमध्ये पावसाचा कहर, टोमॅटो 500 रुपये किलो, जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा