Wai Assembly Constituency : वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांना अरुणादेवी पिसाळ यांचं आव्हान, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये जोरदार सामना
Wai Assembly Constituency : वाई विधानसभा मतदारसंघात मविआ आणि महायुतीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांकडे आलेली आहे.
सातारा : सातारा जिल्ह्यात विधानसभेचे आठ मतदारसंघ आहेत. यापैकी वाई मतदारसंघ यापूर्वी काँग्रेस आणि गेल्या तीन टर्मपासून राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात वाई विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीकडे आला आहे. तर, महायुतीमधील सिटींग गेटिंग सूत्रानुसार ही जागा अजित पवार अध्यक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली आहे. या मतदारसंघात आमदार मकरंद पाटील यांच्यापुढं सातारा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा अरुणा देवी पिसाळ यांचं आव्हान असणार आहे.
मकरंद पाटील विरुद्ध अरुणादेवी पिसाळ यांच्यात लढत
सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांना मविआच्या जागा वाटपात 5 जागा मिळालेल्या आहेत. या पाच जागांपैकी कोरेगाव आणि कराड उत्तरचा उमेदवार पहिल्यांदा जाहीर करण्यात आला होता. त्यानंतरच्या यादीत फलटण आणि शेवटी माण आणि वाई मतदारसंघाचे उमेदवार जाहीर करण्यात आले. शरद पवारांच्या पक्षाकडून अरुणादेवी पिसाळ यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळं आता मतदारसंघात मकरंद पाटील विरुद्ध अरुणादेवी पिसाळ अशी लढत होईल.
वाई विधानसभा मतदारसंघात अरुणादेवी पिसाळ यांच्या उमेदवारी रंगत
वाई विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं मकरंद पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर, दुसरीकडे मकरंद पाटील यांच्या विरोधात उमेदवार कोण द्यायचा याबाबत विचारविनिमय शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून पडताळून पाहण्यात आले. नितीन सावंत आणि अरुणादेवी पिसाळ यांची नावं रेसमध्ये होती. अखेर अरुणादेवी पिसाळ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. विरोधकांचा उमेदवार कोण असणार हे जाहीर होत नसल्यानं मकरंद पाटील यांच्यासाठी सोपी वाटणार निवडणूक आता आव्हानात्मक बनली आहे.
मकरंद पाटील- मदन भोसले लढत होणार नाही
सातारा जिल्ह्यातील वाई विधानसभा मतदारसंघात 2004, 2009, 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मकरंद पाटील विरुद्ध मदन भोसले अशी लढत पाहायला मिळाली होती. मात्र, यावेळी मदन भोसले भाजपमध्ये आहेत. महायुतीत ही जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. त्यामुळं मदन भोसले यावेळी रिंगणात नाहीत. 2004 च्या निवडणुकीत मदन भोसले यांनी मकरंद पाटील यांचा पराभव केला होता. तर, मकरंद पाटील यांनी पुढच्या तीन निवडणुकांमध्ये मदन भोसले यांना पराभूत केलं होतं.
दरम्यान, या विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीवेळी महाविकास आघाडीचे शशिकांत शिंदे आघाडीवर राहिले होते. आता या निवडणुकीत वाईची जनता कुणाला कौल देणार हे पाहावं लागेल.
इतर बातम्या :