एक्स्प्लोर
भारताचा आक्रमक पवित्रा, पाकिस्तानच्या 12 कैद्यांची सुटका रद्द

प्रातिनिधिक फोटो
नवी दिल्ली: पाकिस्ताननं कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनवाल्यानंतर भारतानंही आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. भारत बुधवारी पाकिस्तानच्या 12 कैद्यांची सुटका करणार होता. मात्र, भारतानं निर्णय बदलला असून पाकिस्तानच्या कैद्यांची सुटका रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
कायदा आणि न्यायाचे मुलभूत नियम न पाळता कुलभूषण जाधव यांना फाशी दिली तर ती आम्ही पूर्वनियोजित हत्या समजू, असं पत्र भारताने पाकिस्तान उच्च आयोगाला लिहिलं आहे.
‘रॉ’चे एजंट असल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानमध्ये अटकेत असलेल्या भारताच्या कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. पाकिस्तानी मीडियाने याबाबतचं वृत्त दिलं आहे. रावळपिंडी कोर्टाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली.
कुलभूषण जाधव यांचं 2016 मध्ये इराणमधून अपहरण करण्यात आलं होतं. मात्र ते पाकिस्तानमध्ये कसे सापडले याचं उत्तर अजूनही पाकिस्तानने दिलेलं नाही. आंतरराष्ट्रीय कायद्याने याची माहिती घेण्याचा अधिकार भारताला दिलेला आहे.
भारताने 25 मार्च 2016 ते 31 मार्च 2016 या काळात 13 वेळा पाकिस्तानच्या उच्च आयोगाला कुलभूषण जाधव यांच्याविषयी माहिती मागितली. पण पाकिस्तानने त्याला प्रतिसाद दिला नाही.
कोणत्याही वैध पुराव्याशिवाय कुलभूषण जाधव यांना फाशी देणं हास्यास्पद आहे. त्यांच्यावर खटला चालवला जातोय, याची माहिती देखील आतापर्यंत भारताला देण्यात आली नव्हती, अशा तीव्र शब्दात भारताने पाकिस्तानवर ताशेरे ओढले आहेत.
हेरगिरी प्रकरणी पाकिस्तानात अटक केलेला भारतीय तरुण कुलभूषण जाधव विरोधात ठोस पुरावे नसल्याची कबुली पाकिस्तानने स्वतः दिली आहे. जाधवविरोधात कुठलेही निर्णायक पुरावे नसल्याचं पाकिस्तानचे परराष्ट्र धोरण सरताज अजीझ यांनी स्पष्ट केलं होतं.
मार्च महिन्यात बलुचिस्तानातून कुलभूषण जाधव यांना रॉ एजंट असल्याच्या आरोपातून पाकिस्तानात अटक करण्यात आली होती. भारतीय हेर कुलभूषण जाधवबाबत असलेल्या कागदपत्रांमध्ये निव्वळ काही विधानं आहेत, कोणतेही पुरावे नाही, असं अजीझ यांनी पाकिस्तानच्या सिनेटमध्ये सांगितलं होतं.
कुलभूषण जाधव यांना कायद्याची पायमल्ली करुन फाशी देण्यात आली, तर ही पूर्वनियोजित हत्या समजली जाईल, असा स्पष्ट इशारा भारताने पाकिस्तान उच्च आयोगाला दिला आहे.
कथित कबुलीनाम्याचा व्हिडीओ
यापूर्वी पाकिस्तानकडून कुलभूषण जाधव यांच्या कथित कबुलीनाम्याचा व्हिडीओ जारी केला होता. या व्हिडीओत कुलभूषण जाधव यांनी आपण रॉ एजंट असल्याचं मान्य केल्याचा दावा, पाकिस्तानने केला होता. मात्र भारताने या व्हिडीओच्या सत्यतेवर आक्षेप घेतला होता.
कोण आहेत कुलभूषण जाधव ?
जाधव कुटुंबीय मूळचं सांगलीचं असून सध्या मुंबईत वास्तव्यास आहे. कुलभूषण यांचे वडील मुंबई पोलिस दलाचे माजी कर्मचारी आहेत. कुलभूषण जाधव यांच्यावर ‘रॉ’चे हेर असल्याचा आरोप लावत बलुचिस्तान प्रांतात अटक झाली आहे.
जाधव यांनी नौदलातून निवृत्ती स्वीकारुन व्यवसायाला सुरुवात केली होती. त्यामुळे आपला मुलगा हेर असल्याचा आरोप जाधव कुटुंबीयाने फेटाळून लावला आहे. ‘माझ्या मुलाला यात अडकवण्यात आलं आहे. कुलभूषण इराणच्या चबाहारमध्ये सल्लागार म्हणून व्यवसाय करतो.’ अशी माहिती त्यांच्या वडिलांनी दिली होती.
संबंधित बातम्या:
... तर आम्ही ही पूर्वनियोजित हत्या समजू, भारताने पाकला खडसावलं
कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानी कोर्टाकडून फाशीची शिक्षा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
कोल्हापूर
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
