China Blank Page Revolution: चीनमधील 'ब्लँक पेज रिवोल्यूशन'ची जगभरात चर्चा; सत्ताधाऱ्यांना हैराण करणारे आंदोलन आहे तरी काय?
China Blank Page Revolution: चीनमध्ये सध्या ब्लँक पेज रिवोल्यूशन सुरू असून या आंदोलनाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
China Blank Page Revolution: ना घोषणाबाजी...ना हिंसाचार....तरी चीनच्या सत्ताधाऱ्यांच्या मनात धडकी भरवणारे आंदोलन विविध शहरांमध्ये सुरू आहे. या आंदोलनाने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे. या आंदोलनाला सध्या 'ब्लँक पेज रिवोल्यूशन' (China Blank Page Revolution) अथवा 'A4 क्रांती' म्हणून संबोधले जात आहे. या शांततापूर्ण आंदोलनाने मात्र सत्ताधारी पक्षाच्या कानठळ्या बसल्या आहेत. हे आंदोलन नेमकं सुरू का झालं? हे जाणून घेऊयात..
चीनमध्ये कोरोना महासाथीच्या आजाराने थैमान घातले होते. त्यानंतर जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले. कोरोनाच्या आजाराला संपूर्णपणे हद्दपार करण्यासाठी चीनच्या सरकारने 'झिरो कोव्हिड धोरण' (Zero Covid Policy) स्वीकारले आहे. त्यानुसार, ज्या ठिकाणी कोरोनाबाधित आढळत आहेत, त्या भागांमध्ये लॉकडाऊन, कोरोना चाचणी सातत्याने करण्यात येत आहे. मागील काही दिवसात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली होती. त्यानंतर 'झिरो कोव्हिड पॉलिसी' सक्तीने लागू करण्यात आले आहे.
लोकांमध्ये रोष
सतत सुरू असलेला लॉकडाऊन आणि कोरोना चाचणी यांना चिनी नागरीक वैतागले आहेत. सातत्याने होणाऱ्या लॉकडाऊनमुळे आम्ही कसे जगायचे असा प्रश्न नागरीक विचारू लागले आहेत. व्यवसाय, उद्योगधंदे ठप्प पडत असून लोकांचे रोजगारही जात आहेत. काही दिवसांपूर्वी मोठे आंदोलनही झाले होते. मात्र, त्यानंतर आता या आंदोलनात 'ब्लँक पेज रिवोल्यूशन'ची भर पडली आहे.
आंदोलनात कोऱ्या कागदाचा वापर का?
'ब्लँक पेज रिवोल्यूशन'मध्ये आंदोलकांकडून कोऱ्या कागदाचा वापर केला जात आहे. सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या सेन्सॉरशिपवर या माध्यमातून टीका केली जात आहे. त्याशिवाय, आंदोलकांच्या मते, कोरी कागदं हातात घेतल्याने सरकार त्यांना अटक करू शकत नाही. त्यामुळे आंदोलनात कोऱ्या कागदांचा वापर होत आहे. चीनमध्ये शांघाय ते बीजिंग आणि वुहान ते शिनजियांग पर्यंत या आंदोलनाची धग पोहचली. आंदोलकांनी फक्त कोरी कागदं वापरली.
जगभरात चर्चा
चीनमध्ये सुरू असलेल्या या आंदोलनाची जगभरात चर्चा सुरू झाली आहे. चीनमध्ये सुरू असलेले हे 'ब्लँक पेज रिवोल्यूशन' निर्णायक ठरण्याची शक्यता असल्याचे आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या विश्लेषकांना वाटते. या आंदोलनाचे बहुआयामी परिणाम होतील आणि चीनमधील कम्युनिस्ट पक्षाच्या सत्तेला सुरुंग लागेल असाही काही जणांचा दावा आहे.
चीनमध्ये बदल होणार?
या आंदोलनाचा मोठा दबाब शी जिनपिंग यांच्या नेतृत्वावर निर्माण झाला आहे. शी जिनपिंग आपल्या धोरणावर कायम राहिल्यास मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे आंदोलनही अधिक तीव्र होऊ शकते. त्यामुळे सरकार दोन पावले मागे येणार का, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.