अवघ्या 10 सेकंदात गेम, पाकिस्तानात आश्रय घेणारे 18 दहशतवादी मारले; आता नंबर दाऊदचा?
Pakistan News : विशेष म्हणजे ही हत्या केवळ 10 सेकंदात इतक्या वेगाने होते. पाकिस्तानमधील तपास यंत्रणांना देखील या प्रकरणात काहीच हाती लागत नाही.
नवी दिल्ली : मागील काही दिवसांत पाकिस्तानमध्ये (Pakistan) एकामागून एक अज्ञात व्यक्तींकडून काही मोजक्या दहशतवाद्यांना (Terrorist) ठार मारण्यात येत असल्याच्या घटना समोर येत आहे. द संडे गार्डियनने दिलेल्या वृत्तानुसार, मागील दोन वर्षांत पाकिस्तानमध्ये किमान 18 दहशतवादी मारले गेले आहेत. यातील 16 दहशतवादी असे आहेत ज्यांची मागील 11 महिन्यात हत्या करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, यापैकी बहुतेक मारले गेलेले दहशतवादी हे लष्कर-ए-तैयबा (Lashkar-e-Taiba), जैश-ए-मोहम्मद (Jaish-e-Mohammed) आणि हिजबुल मुजाहिदीन (Hizbul Mujahideen) यांसारख्या दहशतवादी संघटनांशी संबंधित आहेत, जे भारतात वर्षानुवर्षे सातत्याने दहशतवादी घटना घडवत आहेत. त्यातच आता दाऊद इब्राहिमवर (Dawood Ibrahim) देखील विष प्रयोग झाला असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे.
मागील काही वर्षात अज्ञात बंदूकधाऱ्यांकडून पाकिस्तानमध्ये आश्रय घेणाऱ्या दहशतवाद्यांची हत्या केली जात असल्याचे समोर येत आहे. ज्यात, कराची, सियालकोट, नीलम व्हॅली, खैबर पख्तुनख्वा, रावळकोट, रावळपिंडी आणि लाहोरमध्ये राहणाऱ्या दहशतवाद्यांची हत्या करण्यात आल्या आहेत. बहुतेक घटनांमध्ये दुचाकीवरून आलेले मारेकरी अगदी जवळून गोळीबार करून सहज निघून जातात. विशेष म्हणजे ही हत्या केवळ 10 सेकंदात इतक्या वेगाने होते. पाकिस्तानमधील तपास यंत्रणांना देखील या प्रकरणात काहीच हाती लागत नाही. त्यामुळे पाकिस्तानमध्ये अज्ञात बंदूकधाऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या हल्ल्यात ठार होणाऱ्या दहशतवाद्यांची यादी लांबत चालली आहे.
यावर्षी 11 महिन्यांत हे 16 दहशतवादी मारले गेले...
- अदनान अहमद उर्फ हंजला अहमद, लष्कर-ए-तैयबा, कराची
- ख्वाजा शाहिद- लष्कर-ए-तैयबा, नीलम व्हॅली, पीओके
- अकरम गाझी- लष्कर-ए-तैयबा, खैबर पख्तूनख्वा
- रहिमुल्ला तारिक- जैश-ए-मोहम्मद, कराची
- दाऊद मलिक- मसूद अझहरचे गुंड, उत्तर वझिरीस्तान
- शाहिद लतीफ - जैश-ए-मोहम्मद, सियालकोट
- मौलाना रहमान- लष्कर-ए-तय्यबा, कराची
- मुफ्ती कैसर- लष्कर-ए-तय्यबा, कराची
- मोहम्मद रियाझ उर्फ अबू कासिम, रावलाकोट, पीओके
- सरदार हुसैन अरैन, लष्कर-ए-तय्यबा, कराची
- परमजीत सिंग पंजवाड- खलिस्तान कमांडो फोर्स, लाहोर
- खालिद बशीर- लष्कर-ए-तैयबा, लाहोर
- सय्यद नूर शालोबर- लष्कर आणि जैश, खैबर पख्तूनख्वा
- बशीर अहमद पीर- हिजबुल मुजाहिदीन, रावळपिंडी
- सय्यद खालिद राजा- अल बद्र, कराची
- एजाज अहमद अहंगर- ISI, अफगाणिस्तान
आता नंबर दाऊदचा?
एकीकडे अज्ञात बंदूकधाऱ्यांकडून पाकिस्तानमध्ये आश्रय घेणाऱ्या दहशतवाद्यांची हत्या केली जात आहे, तर दुसरीकडे 'अज्ञात' व्यक्तीकडून दाऊदवर विषप्रयोग करण्याची आल्याची चर्चा आहे. या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळाला नसला तरीही चर्चा मात्र जोरात सुरु आहे. विशेष म्हणजे दाऊदची प्रकृती गंभीर असून, त्याच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून पाकिस्तानमध्ये आश्रय घेणाऱ्या दहशतवाद्यांची हत्या आणि दाऊदवर झालेला विषप्रयोग यांचा काही संबंध तर नाही ना? अशीही चर्चा पाहायला मिळत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: