Aditya-L1 Mission : आदित्य L-1 मोहिमेतील L1 पॉइंट म्हणजे नक्की काय? काय आहे L2, L3, L4 आणि L5 चा अर्थ? जाणून घ्या
एल-1 हा सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील एक बिंदू असून हा बिंदू पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर दूर आहे. तिथपर्यंत इस्रोचे अवकाशयान जाणार आहे.
Aditya-L1 Mission : चांद्रयान-3 मोहीम यशस्वी झाल्यानतंर आता इस्रोनं सूर्याचा अभ्यास करण्याची अवघड मोहीम हाती घेतलीय. इस्त्रोचे 'आदित्य एल-1' हे यान 2 सप्टेंबरला सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी सूर्याच्या दिशेने झेपावणार आहे. सूर्याचे तापमान, अतिनील किरणांचा पृथ्वीवर होणारा परिणाम, ओझोन थराची सद्यस्थिती, अंतराळातील हवामान, सौरवादळे आणि त्याचा पृथ्वीवर होणारा परिणाम अशा अनेक गोष्टींचा अभ्यास सौरमोहिमेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. एल-1 हा सूर्य आणि पृथ्वीमधील एक बिंदू असून हा बिंदू पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर दूर आहे. तिथपर्यंत इस्रोचे अवकाशयान जाणार आहे. आदित्य L-1 अंतराळयान ज्या ठिकाणी जाईल त्याला L-1 म्हणजेच Lagrange Point One (1) असे म्हणतात. याच L-1 विषयी सविस्तर जाणून घेऊयात.
पाच Lagrange Point पैकी L-1 बिंदू का निवडला गेला?
ISRO ला सौर क्रियाकलापांचा अभ्यास करायचा आहे जे सूर्याच्या पृष्ठभागावरुन बाहेर पडतात आणि अवकाशात पसरतात आणि काहीवेळा पृथ्वीच्या दिशेने देखील येतात, जसे की कोरोनल मास इजेक्शन, सोलर फ्लेअर्स, सौर वादळे. म्हणून, लॅग्रेंज पॉइंट 1 (L-1) या संदर्भात एक विशेष स्थान आहे, कारण कोरोनल मास इजेक्शन आणि सूर्यापासून निघणारी सौर वादळे या मार्गाने पृथ्वीकडे जातात. L1, L2 आणि L3 या तीन पाॅईंटची जागा निश्चित नसते. तर L4 आणि L5 स्थिर आहेत आणि त्यांची स्थिती बदलत नाही. L3 बिंदू सूर्याच्या मागे आहे. L1 आणि L2 बिंदू थेट सूर्यासमोर आहे. त्यामुळे संशोधनाच्या दृष्टीकोनातूनही L-1 हा बिंदू अतिशय योग्य मानला जातो, कारण तो पृथ्वीच्या जवळ आहे आणि येथून दळणवळण खूप सोपे आहे. पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये पाच लॅग्रेंज बिंदू आहेत. या टप्प्यावर अवकाशयानाचे गुरुत्वाकर्षण केंद्राभिमुख बलाच्या बरोबरीचे होते. त्यामुळे कोणतेही वाहन येथे दीर्घकाळ थांबून संशोधन करू शकते. या जागेला 'स्पेस पार्किंग' असेही म्हणतात, कारण या ठिकाणी अंतराळयान अगदी कमी इंधनात स्थिर होऊ शकते.
लॅग्रेंज पॉइंट म्हणजे काय? (What Is Lagrange Point)
प्रत्येक ग्रहाजवळ असे काही पाॅईंट असतात, जेथे त्या ग्रहाची गुरुत्वाकर्षण शक्ती, अवकाशयानाची कक्षीय गती आणि सूर्याची गुरुत्वाकर्षण शक्ती यांचे संतुलन साधले जाते. त्या ठिकाणी अवकाशयान स्थिर करून सूर्याच्या तेथून निरीक्षणे नोंदवणे, अभ्यास करणे शक्य असते. पृथ्वी आणि सूर्य यांच्या दरम्यान असे पाच पाॅईंट निश्चित करण्यात आले आहेत. त्यांना लॅग्रेंज पॉईंट 1 ते 5 अशी नावे देण्यात आली आहेत. त्यापैकी L-1 या पाॅईंटपर्यंत आदित्य यान जाणार आहे. तेथून ते निरीक्षणे नोंदवेल.
काय आहे मिशन आदित्य L-1 ?
इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी मिशन आदित्यविषयी माहिती दिली आहे. यावर बोलतांना त्यांनी म्हटलं आहे की, "ही भारताची पहिलीच सूर्य मोहीम आहे. या मोहिमेद्वारे भारत सूर्याचा अभ्यास करणार आहे. हे यान 2 सप्टेंबरला लाँच करण्यात येणार आहे. या मोहिमेची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. सतीश धवन अवकाश केंद्रातून आदित्य एल 1 हे यान प्रक्षेपित करण्यात येणार आहे. पुढील पाच वर्ष या मोहिमेद्वारे इस्रो सूर्याचा अभ्यास करणार आहे."
इतर महत्वाच्या बातम्या
Aditya L-1 Mission : लॅग्रेंज पॉईंट म्हणजे काय? कसा केला जाणार सूर्याचा अभ्यास? जाणून घ्या सविस्तर