(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Wardha News : जंगल परिसरात मासोळी पकडण्यासाठी गेलेल्या व्यक्तीवर वाघाचा हल्ला; तीन दिवसांनंतर आढळले शरीराचे तुकडे
Wardha News : पिलापूर येथील जंगल परिसरात मासोळी पकडण्यासाठी गेलेला व्यक्ती वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याची घटना घडली आहे.
Wardha News : वर्धा (Wardha) जिल्ह्यातील आष्टी (Ashti) तालुक्यातील एनाडा पिलापूर येथील जंगल परिसरात मासोळी पकडण्यासाठी गेलेला व्यक्ती वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याची घटना आज (शुक्रवारी) उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली असून सुबराव महादेव बास्कवरे असे मृताचे नाव आहे. मृत झालेल्या व्यक्तीचे वय 45 वर्ष होते. जंगल परिसरात मृतदेहाचे तुकडे आढळून आल्याने ही घटना प्रत्यक्षात उघडकीस आली आहे.
पिलापूर तलावात तीन दिवसांपूर्वी सुबराव हे मासोळी पकडण्यासाठी गेले होते. ते तीन दिवसांपासून घरी परतले नसल्याने गावकऱ्यांनी तीन दिवसांपासून त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. अखेर आज सकाळी गावकरी पुन्हा पाहणी करण्यासाठी जंगल परिसरात गेले असता मौजा पिलापूर संरक्षित वन कक्ष क्रमांक 119 मधील जंगलात सुबराव यांच्या शरीराचे वेगवेगळे भाग दिसून आले. त्यावरून लगेच गावातील नागरिकांनी पोलीस स्टेशन आणि वनविभागाला घडलेल्या घटने संदर्भात माहिती दिली.
अधिकाऱ्यांचं पथक घटनास्थळी दाखल :
या घटनेच्या संदर्भात माहिती मिळताच वनपरीक्षेत्रधिकारी योगानंद उईके आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण लोकरे आपल्या टीमसह घटनास्थळी लगेच दाखल झाले. घटना स्थळावरची पाहणी करून, घटनेचा पंचनामा करून शवविच्छेदन करण्यात आले. पोलीस स्टेशन आष्टी येथे मार्ग दाखल करण्यात आला असून घटना स्थळावरच गावातील नागरिकांनी वनपरीक्षेत्रधिकारी योगानंद उईके यांच्याकडे आर्थिक मदत देण्यासाठी मागणी केली.
महत्वाच्या बातम्या :
- Lumpy Skin Disease : लम्पी चर्मरोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी सांगली जिल्ह्यात मनाई आदेश लागू, जनावर बाजार, बैलगाडी शर्यतींवरही बंदी
- Kolhapur Ganesh Immersion : गणपती पुढे सोडण्यावरून मिरजकर तिकटीला तणाव, पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात