Kolhapur Ganesh Immersion : गणपती पुढे सोडण्यावरून मिरजकर तिकटीला तणाव, पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात
Kolhapur Ganesh Immersion : कोल्हापूर शहरातील मुख्य विसर्जन मार्गावरील मिरजकर तिकटीला गणपती पुढे सोडण्यावरून वादावादीचा प्रसंग घडला. पोलिसांनी बळाचा वापर करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
Kolhapur Ganesh Immersion : कोल्हापूर शहरातील मुख्य विसर्जन मार्गावरील मिरजकर तिकटीला गणपती पुढे सोडण्यावरून वादावादीचा प्रसंग घडला. पोलिसांनी बळाचा वापर करत परिस्थिती नियंत्रणात आणली. यावेळी कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यामुळे काही काळ गोंधळ झाला. त्यामुळे काहींनी रस्त्यांवरच ठिय्या मांडला.
मुख्य मिरवणूक मार्गावर महाद्वार रोडवर प्रत्येक मंडळाला एक तासाची परवानगी असल्याने अनेक मंडळाकडून त्या दिशेने येणाऱ्या मंडळांची रांग लागली आहे. मिरजकर तिकटी येथून नंगिवली आणि पीटीएम ही दोन मंडळे मुख्य मार्गावर आल्यानंतर प्रतीक्षा करूनही मुख्य मिरवणुकीत प्रवेश मिळत नसल्याने देवल क्लबकडून येणाऱ्या मंडळांचे कार्यकर्ते संतप्त झाले.
मिरवणूक रेंगाळू देऊ नका अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली. मिरवणूक रेंगाळल्याचे दाखवून दिल्यानंतर पोलिसांनी मिरवणूक पुढे मार्गस्थ केली. तेव्हाच मिरजकर तिकटी येथून एका मंडळाने पुढे येण्याचा प्रयत्न करताच कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध केला. काही कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. यामुळे गोंधळाचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत हा जमाव पांगवला.
दरम्यान, कोल्हापूर शहरामध्ये मिरवणुकीला रंग चढला असून प्रमुख तालमींची मुख्य मार्गावर एन्ट्री झाल्याने पोलिस सतर्क झाले आहेत. ध्वनीयंत्रणा, पारंपरिक वाद्य, झांजपथक, धनगरी ढोल ताशा पथक तसेच सजीव देखाव्यांनी मिरवणुकीमध्ये रंगत भरत चालली आहे. पन्हाळा वाचवा, लोकराजा शाहूंच्या आठवणी, कोल्हापूर हद्दवाढ आदी देखावे लक्ष वेधून घेत आहेत.
इराणी खणीमध्ये दुपारी तीनपर्यंत 230 मूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे. मुख्य मिरवणूक मार्ग असलेल्या महाद्वार रोडवर एक तासापेक्षा जास्त काळ थांबता येत नसल्याने मिरवणूक वेळेत पुढे सरकत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या