Ujani dam: जल संकट! उजनी धरणाची वाटचाल मृत पाणी साठ्याकडे; पुढील दोन दिवसात धरण मायनसमध्ये जाण्याची शक्यता
Solapur : पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेलं उजनी धरण (Ujani Dam) पुढील दोन दिवसांमध्ये मायनसमध्ये जाण्याची शक्यता आहे. उजनी धरण हे केवळ आता साडेतीन टक्के प्लस आहे.

Solapur : पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेलं उजनी धरण (Ujani Dam) पुढील दोन दिवसांमध्ये मायनसमध्ये जाण्याची शक्यता आहे. उजनी धरण हे केवळ आता साडेतीन टक्के प्लस आहे. म्हणजे उजनीमध्ये केवळ 2 टीएमसी इतकाच जिवंत पाणीसाठा आहे. त्यानंतर उजनी धरण हे मृत पाणी साठ्यात जाणार आहे. सध्या उजनी धरणामधून भीमा नदी पात्रामध्ये 6 हजार क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. त्यामुळे उजनीची पाणी पातळी झपाट्याने कमी होत आहे. गतवर्षी पाऊस चांगला झाल्याने धरण पूर्ण क्षमतेने म्हणजे 110 टक्के भरले होते. धरणाची पाणी साठवण क्षमता 123 टीएमसी असून यांपैकी 63 टीएमसी पाणीसाठा मृतसाठा असतो. तर 54 टीएमसी पाणी उपयुक्त साठ्यात असते. सध्या उजनी धरणात एकूण पाणी साठवून क्षमतेच्या 65 पूर्णांक 57 टीएमसी इतकाच पाणीसाठा आहे. त्यामुळे आगामी काळात जल संकट अधिक गडद होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
अक्कलकोटच्या कुरनूर धरणातून 250 क्युसेसने पाण्याचा विसर्ग, 3 दरवाजे उघडले
उन्हाळी हंगामासाठी अक्कलकोटच्या कुरनूर धरणातून आज (16 एप्रिल ) दुसऱ्या आवर्तनाचे पाणी 250 क्युसेसने सोडण्यात आले. यासाठी धरणाचे 3 दरवाजे उघडण्यात आले आहेत. सध्या कुरनूरच्या धरणात 27 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यापैकी अंदाजे 8 ते 10 टक्के पाणी विसर्गासाठी वापरण्यात येणार आहे. धरणाखालील एकूण 8 बंधारे या पाण्यावर अवलंबून आहेत. मात्र, कमी साठ्यामुळे सर्व बंधारे भरतील की नाही, याबाबत अनिश्चितता आहे. तरीही, नदीकाठच्या गावांना पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी उपयुक्त ठरणार आहे.
हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थांची दाहीदिशा
वर्ध्याच्या आष्टी तालुक्यातील चामला या गावातील ग्रामस्थांची हंडाभर पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती होत आहे. ग्रामस्थांना एक ड्रम पाण्यासाठी दोनशे ते तिनशे रुपये मोजावे लागत आहे. गावातील पाणी निवारणासाठी अजूनही ठोस उपाययोजना करण्यात आली नाही. त्यामुळं बाजूच्या गावातून आठवड्यातून एकदा पाणी आणावं लागत आहे. त्यामुळं चामला गाव अजूनही तहानलेलचं आहे.
चामला या पाचशे लोकसंख्या असलेल्या गावात ही विहीर आहे. ज्यात बाजूच्या गावातून पाईपलाईनद्वारे पाणी येतं. शेजारच्या गावातून मिळणारं पाणी चामला गावासाठी अपुरं पडतं. त्यामुळेच आठवड्यातून एकवेळ काही मिनिटांसाठी पाणी नळाला मिळतं. गेल्या अनेक वर्षापासून हीच परिस्थिती या परिसरात आहे. महिलांच्या डोक्यावर हंडा, तरुणांच्या मोटरसायकलवर पाण्याच्या कॅन तर म्हाताऱ्यांच्या हातात बादल्या. सकाळ संध्याकाळ पाण्यासाठी परिसर पिंजून पाणी आणलं जात आहे. शासन दरबारी पाणीबाणी सोडविण्याची विनंती झाली. आमदार, खासदारांचे उंबरठे झिजवून झाले, पण ही पाणीबाणीअद्याप सुटली नाहीए. गावातल्या या पाणी टंचाईवर महिलांचा रोष व्यक्त केला आहे.
तीन किलो मीटरवर नदी, मात्र दहा गाव तहानलेलीच!
दरम्यान, चामला गावापासून तीन किलो मीटर अंतरावर जाम नदी आहे. याच नदीचे पाणी अप्पर वर्धा धरणात पोहचते. छोटा तलाव बांधून हे पाणी अडवले तर या गावासह परिसरातील दहा गावांचा पाण्याचा प्रश्न सुटू शकतो. सध्या गावात इतर शेतांमधून पाणी आणून गावकरी आपली तहान भागवत आहे. तर काहीजण पाण्यासाठी पैसे देखील मोजत आहे. यावर तोडगा काढण्याची मागणी होते आहे.
हे ही वाचा
























