(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Viral Video : तब्बल 9 तास उशिरा आली ट्रेन, प्लॅटफॉर्मवरच नाचत प्रवाशांनी व्यक्त केला आनंद! पाहा व्हिडीओ
Viral Video : ट्रेन 9 तास उशीराने स्टेशनवर पोहोचल्यानंतर प्रवाशांच्या प्रतिक्रिया पाहण्यासारख्या होत्या.
Viral Video : देशात रेल्वेला (Indian Railway) उशीर होणं ही एक सामान्य बाब समजली जाते. तासनतास उशिराने धावणाऱ्या गाड्यांमुळे प्रवास करणारे प्रवासी अक्षरश: वैतागतात. रेल्वेची वाट बघत फलाटावर तासनतास बसणारे प्रवासीच त्यांच्या या अडचणीबद्दल अधिक चांगलं सांगू शकतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ट्रेन 9 तास उशीराने स्टेशनवर पोहोचल्यानंतर प्रवाशांच्या प्रतिक्रिया पाहण्यासारख्या होत्या. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये लोकं प्लॅटफॉर्मवरच नाचताना, तसेच ट्रेनच्या आगमनाचा आनंद साजरा करताना दिसत आहेत.
Our train got late by 9 hours. This is how people reacted when it arrived. pic.twitter.com/8jteVaA3iX
— Hardik Bonthu (@bonthu_hardik) November 27, 2022
...आणि प्लॅटफॉर्मवरच नाचू लागले प्रवासी
ट्विटरवर हार्दिक बोंथू नावाच्या युजरने हा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, आमची ट्रेन 9 तास उशीराने आली. तिचे आगमन होताच लोकांनी प्रतिक्रिया दिल्या. ट्रेन प्लॅटफॉर्मवर येताच लोकांनी जल्लोष सुरू केला. हा प्लॅटफॉर्म प्रवाशांनी संपूर्ण भरल्याचे व्हायरल क्लिपमध्ये दिसत आहे. तेव्हाच हॉर्न वाजवत ट्रेन फलाटावर येते. हे पाहून तेथे उपस्थित असलेले अनेक प्रवासी नाचू लागले आणि आनंद साजरा करू लागले.
ट्रेनसमोर वाकून आभार, व्हिडीओ पाहा
ट्रेनचा अंधूक प्रकाश दिसताच प्लॅटफॉर्मवर उभे असलेले अनेक प्रवासी तिची आतुरतेने पाहत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. प्लॅटफॉर्मजवळ ट्रेन थांबताच लोक टाळ्या वाजवू लागतात आणि नाचू लागतात. आपण पाहू शकता की, या वेळी एक व्यक्ती ट्रेनसमोर वाकून तिचे आभार मानतो.
9 तास उशिराने धावणारी ही कोणती ट्रेन आहे?
आता हा व्हिडीओ पाहून ट्विटर यूजर्सही कमेंट करण्यापासून स्वतःला रोखू शकले नाहीत. 9 तास उशिराने धावणारी ही कोणती ट्रेन आहे, असा सवालही काहींनी केला आहे. कारण कोरोनाच्या कालावधीनंतर गाड्यांमध्ये असा विलंब क्वचितच पाहायला मिळतो. एका यूजरने लिहिले आहे की, टीडीआर भरून रिफंड घ्या भाऊ. आणखी एका युजरने लिहिले आहे की, आता हे देशात सामान्य झाले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या: