Spicy Chilli: सर्वात तिखट मिरची पिकवली, झाला फेमस; वर्ल्ड रेकॉर्डही नावावर
US: अमेरिकेतील पकरबट पेपर कंपनीचे मालक एड करी यांनी जगातील सर्वात तिखट मिरची पेपर एक्स पिकवली आहे. त्यांनी आपल्या नावावर सर्वात तिखट मिरची पिकवल्याचा वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे.
Spicy Chilli: आपल्यापैकी अनेकांना गोड पदार्थांपेक्षा तिखट पदार्थ खूप आवडतात. पण जर तुमचं एक दिवसाचं जेवण जगातील सर्वात तिखट मिरचीपासून (Chilly) बनवलं असेल तर? साहजिकच हे खाल्ल्यानंतर तुमच्या तोंडातून आणि कानातून धूर निघेल. अमेरिकेत एक असे व्यक्ती आहेत, ज्यांनी सर्वात तिखट मिरची पिकवून विश्वविक्रम (World Record) केला आहे. तिखटपणाच्या बाबतीत या मिरचीने जगातील सर्व मिरच्यांना मागे टाकलं आहे.
कोणती आहे ही मिरची?
तर या मिरचीचं नाव आहे पेपर एक्स. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सनुसार, या मिरचीचा तिखटपणा सरासरी 26.93 लाख स्कोव्हिल हीट युनिट्स आहे, जो इतर मिरच्यांपेक्षा सर्वात जास्त तिखट आहे. ही केवळ एक मिरची खाल्ली तरी घाम फुटतो आणि डोळ्यातून-नाकातून पाणी वाहायला लागतं. इतकंच नाही तर संपूर्ण शरीराला आग लागल्यासारखं वाटतं.
कोणी उगवली पेपर एक्स मिरची?
अमेरिकन मीडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, ही मिरची ज्याला आपण पेपर एक्स म्हणून ओळखतो, ती अमेरिकेच्या पकरबट पेपर (Puckerbutt Pepper) कंपनीचे मालक एड करी यांनी पिकवली आहे. एड करी यांनी यूट्यूबच्या माध्यमातून लोकांना आपण पिकवलेल्या जगातील सर्वात तिखट मिरचीबद्दल सांगितलं.
एड करी यांनी आपल्या मिरचीची तुलना विन्थ्रॉप विद्यापीठातील दुसऱ्या मिरचीशी केली आहे, जी अत्यंत तिखट असल्याचं म्हटलं जातं. ही मिरचीची वनस्पती नैसर्गिकरित्या कुठेही आढळत नाही. अॅड करी यांनी क्रॉस ब्रीडिंगद्वारे या मिरचीचं पीक घेतलं आणि ती वाढवली.
अनेक प्रयोगांनंतर मिळालं यश
मीडियाशी बोलताना एड करी यांनी सांगितलं की, त्यांनी या मिरचीचं पीक घेण्यासाठी 100 पेक्षा जास्त प्रयोग केले. 10 वर्षांनंतर केलेल्या अथक प्रयत्नांनंतर त्यांचा पेपर एक्स मिरचीचा प्रयोग यशस्वी झाला. याआधी जगातील सर्वात तिखट मिरचीचा रेकॉर्ड कैरोलिना पेपर नावाच्या मिरचीवर होता. या मिरचीचा तिखटपणा जवळपास 16.41 लाख एसएचयू इतका होता.
कॅरोलिना पेपर देखील खूप तिखट मिरची आहे. 2013 मध्ये, मसालेदारपणाच्या बाबतीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये या मिरचीला स्थान मिळालं. या मिरचीचं उत्पादन देखील अमेरिकेत घेतलं जातं. ही मिरची स्वीट हबनेरो आणि नागा वाइपर मिरची यांच्यामध्ये क्रॉस करुन तयार केली जाते. अनेक प्रकरणांमध्ये, कॅरोलिना रेपर मिरची खाणं अत्यंत धोकादायक ठरू शकतं.
हेही वाचा:
Species Chilli : 'या' आहेत जगातील सर्वात चार तिखट मिरच्या, संपूर्ण कुटुंब एक मिरचीही खाऊ शकणार नाही