Lottery News : नशीब फळफळलं आणि 'तो' एका दिवसात कोट्यधीश बनला... एका रात्री खात्यात आले 200 कोटी रुपये
Lottery News : एक दिवस अचानक एका मजुराच्या खात्यात 200 कोटी रुपये आले आणि तो चक्क कोट्यधीश बनला.
मुंबई : प्रत्येक जण स्वत:चं जीवन आणि भविष्य सुखकर करण्यासाठी मेहनत करत असतो. या मेहनतीच्या साथीला काही जणांना नशीबाची साथ लागते. काही जण आयुष्यभर मेहनत करत राहतात, तर काही जण नशीबाच्या जोरावर एका रात्रीत श्रीमंत होतात. जर अचानक तुमच्या बँक खात्यात कोट्यवधी रुपये आले तर... 'भगवान देता है तो छप्पर फाड के...' ही म्हण एका हातमजुरीवर पोट भरणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीत खरी ठरली आहे. मोलमजुरी करणाऱ्या या व्यक्तीच्या खात्यात अचानक कोट्यवधी रुपये आले आणि यावर त्यालाही विश्वास बसणं कठीण झालं.
...आणि 'तो' एका दिवसात कोट्यधीश बनला
एक दिवस अचानक या मजुराच्या खात्यात 200 कोटी रुपये आले आणि तो चक्क कोट्यधीश बनला. तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही पण खरं आहे. याबाबत कळल्यावर हा मजूरही आश्चर्यचकित झाला. ही घटना हरियाणामध्ये घडली आहे. हरियाणातील मजुराच्या बँक अकाऊंटवर अचानक 200 कोटी रुपये आले. आठवी पास मजुराच्या खात्यावर एवढी मोठी रक्कम आल्याचे समजतात, त्याच्यासह त्याच्या कुटुंबियांनाही धक्का बसला.
एका रात्री खात्यात आले 200 कोटी रुपये
हरियाणाच्या दादरी जिल्ह्यातील बेरला गावात राहणाऱ्या विक्रम नावाच्या व्यक्तीसोबत ही अविश्वसनीय घटना घडली आहे. ही एवढी मोठी रक्कम म्हणेज तब्बल 200 कोटी रुपये बँक खात्यावर नेमके आले कुठून याची कल्पना या मजुरालाही नव्हती. अचानक कोट्यवधी रुपये बँक अकाऊंटवर आल्यावर मजुरासह त्याच्या कुटुंबियांनाही भीतीने घाम फुटला. कारण या रकमेचे वाली नेमका कोण आणि हे पैसे नेमके आले कुठून हेच त्यांना माहित नव्हतं.
200 कोटी रुपये अकाऊंटवर आल्याचं माहितच नव्हतं
महत्त्वाचं म्हणजे तब्बल 200 कोटी रुपये अकाऊंटवर आल्याचं मजुरालाही माहित नव्हतं. उत्तर प्रदेश पोलिसांना याबाबत माहिती मिळाली. त्यांनी या मजुराला याबाबत माहिती दिली. याबाबत माहिती मिळताच मजुराने हरियाणा पोलिसांकडे याबाबत तक्रार केली आणि मदतीची विनंती केली. मोठी फसवणूक झाल्याचं मजूर आणि कुटुंबीयांचं म्हणणं आहे.
असा खुलासा झाला
मीडिया रिपोर्टनुसार, मोलमजुरी करणाऱ्या विक्रमला आपल्या अकाऊंटवर कोट्यवधी रुपये आल्याबाबत कोणतीही माहिती नव्हती. विक्रमला ही माहिती युपी पोलिसांकडून मिळाली. युपी पोलीस अचानक विक्रमच्या घरी पोहोचले आणि त्याची चौकशी सुरू केली. पोलिसांनी त्याला विचारले की, त्याच्या खात्यात 200 कोटी रुपयांचा व्यवहार कसा झाला? हे ऐकून विक्रम आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला. विक्रमने पोलिसांना सांगितलं की, त्याच्या अकाऊंटवर इतके पैसे कसे आणि कुठून आलं याबाबत त्याला कोणतीही माहिती नाही. त्यानंतर पोलिसांनी विक्रम आणि त्याच्या कुटुंबीयांचा जबाब नोंदवून घेतला. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.
प्रकरणाची सखोल चौकशी सुरू
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या बँकेकडून संबंधित बँक अकाऊंट गोठवण्यात आलं असून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू झाली आहे. विक्रमच्या खात्यात एकाच वेळी एवढी रक्कम कशी ट्रान्सफर झाली, याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे. विक्रमने सर्व उच्च अधिकारी आणि मुख्यमंत्र्यांनाही या प्रकरणी मदतीचं आवाहन केलं आहे. सध्या ही बातमी सर्वत्र वाऱ्याच्या वेगाने पसरली असून सगळीकडे याची चर्चा सुरु आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :