एक लव्हस्टोरी अशीही... तहानलेल्या महावताला हत्तीने पाजलं पाणी, कलमापूरच्या हापश्यावरील व्हायरल कहाणी
सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात अनेक व्हिडिओ मजेशीर, काही त्रास देणारे, तर काही व्हिडिओ तितकेच भावनिक करणारेही असतात.
गडचिरोली : बॉलिवूडचा पडदा गाजवणारे सुपरस्टार दिवंगत अभिनेते राजेश खन्ना (Rajesh khanna) यांचा हाथी मेरे साथी हा चित्रपट चांगलाच गाजला होता. हत्ती आणि माणसाच्या प्रेमाची सुंदर अन् तितकीच भावुक कथा या चित्रपटातून 70 मिमि पडद्यावर झळकली. प्रेक्षकांनीही या चित्रपटावर, राजेश खन्नावर तुफान प्रेम केलं. माणसाळलेल्या हत्तीची मैत्री प्रेक्षकांना लय भारी आवडली अन् चित्रपटही बॉक्स ऑफिसवर गाजला. हत्ती पाहिल्यानंतर 1971 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची आठवण झाल्याशिवाय राहात नाही. गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातही हत्ती आणि माणसाची मैत्री सध्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे. उन्हाळ्याच्या कडाक्यात माणसाची तहान भागविण्याचं काम हत्तीकडून (Elephant) करण्यात येत असल्याचे या व्हिडिओतून दिसून येते.
सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात अनेक व्हिडिओ मजेशीर, काही त्रास देणारे, तर काही व्हिडिओ तितकेच भावनिक करणारेही असतात. करमणुकीचं साधन असलेल्या सोशल मीडियावरील काही व्हिडिओ मनाला मोठा आनंद देऊन जातात. त्यामुळे, आपला दिवसही चांगला जातो. काही दिवसांपूर्वी असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, त्यात हत्तीचा देखरेख करणारा महावत पाण्याची बोरिंग हलवून हत्तीची पाण्याची तहान भागवत आहे. आता, पुन्हा एकदा हत्ती आणि महावताचा असाच एक व्हिडिओ चर्चेत आला आहे. या व्हिडिओतील हत् आणि मनुष्याची मैत्री पाहून तुम्हालाही आश्चर्य व आनंद वाटेल. मैत्री असावी तर अशी, असे शब्द हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या मुखातून आपसूकच येतील. कारण, हत्तीच स्वत:च्या सोंडेने हापस्यातून महावताची तहान भागवताना दिसत आहे.
महाराष्ट्रातील एकमेव वनविभागाच्या कमलापूर हत्ती कॅम्पमधील हे दृश्य आहे. दक्षिण गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूरमध्ये वनविभागाटा हत्ती कॅम्प आहे, तिथे रुपा नामक हत्तीला नेहमीप्रमाणे जंगलातून फेरफटका मारुन परत कॅम्पमध्ये आणताना तिची काळजी घेणाऱ्या महावताला तहान लागली. त्यावेळी, चक्क रुपा हत्तीने महावताला पाणी पिण्यासाठी बोरिंगच हँडल आपल्या सोंडीने हलवलं आणि महावताची तहान भागवली. त्यामुळेच, हत्तीला जगातील सर्वात बुद्धिमान प्राणी मानतात, वन्य प्राणी आणि मानव यांच्या सहजीवनाचं उत्तम उदाहरण या घटनेतून आपल्याला बघायला मिळालं आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी हत्तीशी गट्टी केलेल्या तामिळनाडूतील माहूत दाम्पत्याच्या जीवनावर आधारीत चित्रपटाला थेट ऑस्कर मिळाला होता. 13 मार्च रोजी झालेल्या ऑस्कर पुरस्कार 2023 मध्ये एलिफंट व्हिस्पर्सने सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा किताब पटकावला आहे. चित्रपटाचे हे यश पाहून तामिळनाडू सरकारने हत्ती आणि त्यांच्या केअरटेकर्ससाठी एक चांगला निर्णय घेतला. तर, जगभरातून तामिळनाडूतील या दाम्पत्याचं कौतुकही करण्यात आलं होतं.