कारवाईने भीतीचे वातावरण, शरद पवारांच्या पठ्ठ्याने सांगितली कारखान्यावरील जप्तीची A टू Z स्टोरी
पंढरपूरमधील विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर दोन वर्षांपूर्वी पूर्वीचे सत्ताधारी भगीरथ भालके यांचा पराभव करून अभिजित पाटील यांनी हा कारखाना जिंकला होता.
सोलापूर : भाजपाकडून सत्तेचा गैरवापर केला जात असून विरोधी पक्षाच्या नेत्यांवरच कारवाईचा बगडा उगारला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून होत असतो. गेल्या काही वर्षात ईडी (ED) आणि सीबीआयसारख्या तपास यंत्रणांचा वापर करुन सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांना अडकविले जात आहे. त्यातच, आता निवडणुकांच्या तोंडावर सत्ताधाऱ्यांना क्लीन चीट अन् विरोधकांवर कारवाई होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. एका बाजूला लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असताना आणि शरद पवार सोलापूर (Solapur) जिल्ह्यात प्रचार करीत असताना त्यांचे अत्यंत निकटवर्तीय असणाऱ्या अभिजित पाटील यांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे गोडाऊन सील करण्याचे काम शिखर बँकेने केल्याने खळबळ उडाली आहे. विठ्ठल कारखान्याकडे शिखर बँकेचे जवळपास 500 कोटी रुपये थकीत असून याबाबत 2021 पासून कारवाई सुरु होती. आता कारखान्याचे गोदाम सील करण्यात आल्याने सर्वत्र खळबळ उडाली असून अभिजीत पाटील यांनी न्यायालयात जाणार असल्याचे म्हटले आहे.
पंढरपूरमधील विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर दोन वर्षांपूर्वी पूर्वीचे सत्ताधारी भगीरथ भालके यांचा पराभव करून अभिजित पाटील यांनी हा कारखाना जिंकला होता. पहिल्या वर्षी 7 लाख 80 हजार तर दुसऱ्या वर्षी 10 लाख 85 हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करीत अभिजित पाटील यांनी बँकेचे जवळपास 35 कोटी रुपये फेडले होते. काही दिवसापूर्वी पुन्हा एकदा शिखर बँकेने कारवाईचा बडगा उचलल्यावर पाटील यांनी न्यायालयातून कालपर्यंतची स्थगिती आदेश मिळवला होता. मात्र, आज सकाळीच शिखर बँकेची टीम पोलिसांसह कारखाना कार्यस्थळावर कारवाईसाठी दाखल झाली. यावेळी अभिजित पाटील शरद पवार यांच्या करमाळा येथील सभेत होते. आमदार रोहित पवार यांनी तेथील भाषणातून अभिजित पाटील यांच्या कारखान्यावर कारवाईला सुरुवात झाल्याचे सांगताच पाटील तडकाफडकी कार्यक्रम सोडून कारखान्यावर पोचले. मात्र, तोपर्यंत अधिकाऱ्यांनी कारखान्याची साखर असलेली 3 गोदाम सील करून निघून गेले होते. एकाबाजूला आचारसंहिता सुरु असताना अशा पद्धतीची कारवाई झाल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे.
सध्या पैसे भरणे अशक्य पण...
अभिजित पाटील यांनी यावर बोलताना म्हटले की, न्यायालयात केस चालू होती, काल स्टे उठला आहे आणि आज सकाळी तात्काळ अधिकाऱ्यांनी गोडाऊन सील केले आहे. 1 लाख पोती साखर शिल्लक आहे, साखर विकून शेतकऱ्यांना भेट द्यायची होती. मात्र, काही झाले तरी यातून लवकरच तोडगा काढून शेतकऱ्यांचे व कामगारांचे पैसे दिले जातील. हे सर्व कर्ज पूर्वीच्या बॉडीने केलेले असून त्यांच्या भ्रष्टाचाराबाबत त्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. बँकेने कर्जाच्या 25 टक्के म्हणजे जवळपास 125 कोटी रुपये तातडीने भरण्यास सांगितले आहेत. सध्या हे पैसे भरणे अशक्य असून टप्प्या टप्प्याने पैसे भरणार असल्याचा प्लॅन देखील बँकेला दिला होता. मात्र, असे असताना अचानक बँकेने केलेल्या या कारवाईमुळे भीतीचे वातावरण तयार झाल्याचे अभिजीत पाटील यांनी म्हटले. दरम्यान, शरद पवार आज पंढरपूर येथे सभा घेऊन मुक्कामी थांबणार असल्याने आता या कारवाईबाबत काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अभिजीत पाटील प्रचारात सक्रीय
दरम्यान, माढा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी अभिजीत पाटील यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. मोहिते पाटील पक्षात आल्यामुळे मलाच आमदार झाल्यासारखं वाटू लागलयं, असंही अभिजीत पाटील यांनी म्हटलं होतं. त्यातच, प्रचारात आघाडी घेताच अभिजीत पाटलांवर अशी कारवाई झाल्याने पुन्हा एकदा सत्ताधारी पक्षाच्या गैरवापराची चर्चा जिल्ह्यात रंगली आहे. दरम्यान अजित पवार आणि सुनेत्रा पवारांना क्लीनचीट मिळाली असतानाच दुसरीकडे शरद पवारांच्या पक्षातील नेत्यांवर कारवाई सुरु असल्याने सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत.
कारखान्यात चिकटवली नोटीस
या कारखान्याच्या 3 गोडाऊनला दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सिल केले आहे. यात श्री विठ्ठल सहकारी साखर कारखानाची चल मालमत्तेचा (साखरसाठा) ताबा दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई यांचे मार्फत प्राधिकृत अधिकारी कैलास नामदेव घनवट, प्रादेशिक कार्यालय, पुणे यांनी सेक्युरिटायझेशन कायदा 2002, कलम १३ (४) अन्वये तसेच डी. आर.टी कोर्ट, पुणे दावा क्र.एस.ए.६२/२०२४ मध्ये २५ एप्रिल २०२४ रोजी झालेल्या सुनावणी मध्ये मा. कोर्टाने दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप बँकेच्या, सरफेसी कायद्यान्वये कारखान्याच्या मालमत्ता जप्ती अनुषंगाने दिलेला स्टे उठविल्यानुसार व पुरक नियमाप्रमाणे 26 एप्रिल 2024 रोजी ताबा घेतला आहे. सर्व कर्जदार व आम जनतेस सुचित करण्यात येते की, सदर उपरोक्त कारखान्याच्या चल मालमत्तेचा कोणाशीही कुठल्याही प्रकारचा हस्तांतर/तबलीचा/ विक्रीचा व्यवहार करू नये अशा प्रकारचे व्यवहार केल्यास ते बेकायदेशीर ठरतील यांची नोंद घ्यावी, असे दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकचे प्राधिकृत अधिकारी कैलास नामदेव घनवट यांनी कारखान्याच्या गोडाऊनवर चिटकविलेल्या नोटीसमध्ये आवाहन केले आहे.