Anand Mahindra : 11 वर्षांची मेहनत फळाला! श्रीनगरच्या अहमदने बनवली सोलर कार, आनंद महिंद्रांची सोबत काम करण्याची इच्छा
Anand Mahindra : आनंद महिंद्रा यांनी एक व्हिडीओ ट्विट करत या व्यक्तीच्या मेहनतीचे कौतुक केलंय, तसेच त्याच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
Anand Mahindra : देशात पेट्रोलच्या (Petrol) वाढत्या किंमती दिवसेंदिवस गगनाला भिडत आहेत, यामुळे प्रत्येकजण त्रस्त झाला आहे. ज्यामुळे लोक सतत वाहतुकीच्या साधनांसाठी पर्याय शोधत आहेत, अशातच, काश्मीरमधील एक व्यक्ती सध्या त्याच्या नव्या शोधामुळे चर्चेत आहे. या व्यक्तीने सौरऊर्जेवर चालणाऱ्या कारचा शोध लावला आहे. मात्र आता याच व्यक्तीची 11 वर्षांची मेहनत फळाला आली आहे. कारण चक्क उद्योजक आनंद महिंद्रा यांनी एक व्हिडीओ ट्विट करत या व्यक्तीच्या मेहनतीचे कौतुक केलंय, तसेच त्याच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
आनंद महिंद्रांचे कौतुकास्पद ट्विट...
आनंद महिंद्रांनी ट्विट करत म्हटले, बिलालची इच्छाशक्ती वाखाणण्याजोगी आहे. ही कार त्यांनी एकट्याने विकसित केल्याने मी त्याचे कौतुक करतो. या कारच्या डिझाइनला उत्पादन तसेच अनुकूल आवृत्तीमध्ये विकसित करणे आवश्यक आहे. बिलालचे हे कर्तृत्व पाहून महिंद्रा रिसर्च व्हॅली मधील महिंद्राची टीम त्याच्या बरोबरीने काम करू शकेल आणि त्याचा आणखी विकास करू शकेल. असे आनंद महिंद्रा म्हणाले.
Bilal Ahmed, a mathematics teacher from Srinagar built a solar-powered car. His innovation is a step forward in the electronic vehicle market and a green mode of transport. @anandmahindra #solarcar #technology #sustainability #solarenergy pic.twitter.com/gXUGnE1THO
— The Better India (@thebetterindia) July 9, 2022
कारचे फोटो सध्या व्हायरल
व्हायरल व्हिडीओमध्ये ही सौरऊर्जेवर चालणारी कार दिसत आहे. लक्झरी कारसारखे दरवाजे असणाऱ्या या सेडान कारचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत. श्रीनगरमधील गणिताचे शिक्षक बिलाल अहमद त्यांच्या या कर्तृत्वामुळे व्हायरल झाले आहेत. या कारच्या बोनेटपासून मागील विंडशील्डपर्यंत, कारच्या जवळपास सर्व बाजूंनी काढलेले फोटो ऑनलाइन व्हायरल होत आहेत..
मर्सिडीज, फेरारी, BMW सारख्या कार हे सर्वसामान्यांसाठी फक्त एक स्वप्न
अहमद यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, "मर्सिडीज, फेरारी, BMW सारख्या कार हे सर्वसामान्यांसाठी फक्त एक स्वप्न आहे. फार कमी लोकांना ते न परवडणारे आहे, तर इतरांसाठी अशा गाड्या चालवणे हे एक स्वप्नच राहते". लोकांना अलिशान कारचा अनुभव देण्यासाठी मी हा विचार केला आहे. त्यांनी पुढे सांगितले की, सुरुवातीला त्यांनी अपंगांसाठी वाहन उपलब्ध करून देण्याची योजना आखली, परंतु निधीअभावी ते अपूर्ण राहिले. त्यानंतर पेट्रोलचे दर वाढल्याने अहमदने त्याचे सौरऊर्जेवर चालणाऱ्या कारमध्ये रूपांतर करण्याची योजना आखली. 11 वर्षांच्या मेहनतीनंतर अहमद यांना ही कार बनवण्यात यश आले आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या